Sushant had turned down the offer of the film, the producer Bhansali informed the police | सुशांतनेच नाकारली होती चित्रपटाची ऑफर, निर्माते भन्साळी यांची पोलिसांना माहिती

सुशांतनेच नाकारली होती चित्रपटाची ऑफर, निर्माते भन्साळी यांची पोलिसांना माहिती

मुंबई : सुशांतनेच माझ्या चित्रपटाची आॅफर नाकारल्याचे चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांनी सोमवारी वांद्रे पालिसांना जबाबात सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
व्यावसायिक वैमनस्यातून अभिनेता सुशांतसिंह राजपूत (३४) याचे फिल्मी करिअर संपविण्याचा प्रयत्न बॉलीवूडच्या मोठ्या हस्तींकडून केल्याचा आरोप झाल्यानंतर या प्रकरणी पोलीस चौकशी सुरू आहे. सोमवारी भन्साळी यांच्याशी जवळपास तीन तास बोलून पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविला. सुशांतला रिप्लेस करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. कारण ‘रामलीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटांसाठी ज्याची निवड होईल, त्या अभिनेत्याने पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे, अशी माझी अपेक्षा होती. मात्र, सुशांत त्यावेळी ‘पानी’साठी काम करत होता. त्यामुळे त्याला माझ्या चित्रपटात काम करणे शक्य नव्हते आणि त्यामुळे त्यानेच आॅफर नाकारल्याचे भन्साळी यांनी तपास अधिकाऱ्यांना सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सुशांतच्या ते फारसे जवळ नव्हते, त्यामुळे त्याची मानसिक स्थिती काय आहे, याबाबत ते सांगू शकत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केल्याचे समजते.

सुशांत गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याच्या बेडरूममध्ये १४ जून, २०२० रोजी आढळला होता. त्याने आत्महत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले आहे. त्यामागचे कारण शोधण्यासाठी ३० ते ३२ जणांचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही.

इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज घेतले ताब्यात
सुशांतच्या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले. यातून काही हाती लागते का, याचा तपास सुरू आहे. त्याने गळफास घेतलेल्या हिरव्या कपड्याची क्षमता किती होती, याच्या अहवालाची प्रतीक्षा पोलिसांना आहे.

 

Web Title: Sushant had turned down the offer of the film, the producer Bhansali informed the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.