2 वर्षे ना सुनावणी ना सुटका, तुरुंगातच दिला बाळाला जन्म; जाणून घ्या प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 19:30 IST2021-12-20T19:29:29+5:302021-12-20T19:30:25+5:30
महिलेला अटक केली तेव्हा ती गर्भवती होती, यानंतर तिने तुरुंगातच मुलाला जन्म दिला. दोन वर्षे या प्रकरणाची सुनावणीच झाली नाही.

2 वर्षे ना सुनावणी ना सुटका, तुरुंगातच दिला बाळाला जन्म; जाणून घ्या प्रकरण?
नवी दिल्ली : मेघालयातील एका महिलेला मानवी तस्करीच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर तिला दोन वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. यादरम्यान तिने तुरुंगात मुलाला जन्म दिला. सर्वोच्च न्यायालयाने आता या महिलेला जामीन मंजूर केला आहे. तिच्यावर कोणताही खटला सुरू होऊ शकत नाही आणि त्यामुळेच तिला जास्त काळ तुरुंगात ठेवता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले. मुख्य न्यायमूर्ती एनव्ही रमणा, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठाने मानवी तस्करीचा आरोप असलेल्या 21 वर्षीय महिला द्रभामोन पाहवा हिला जामीन मंजूर केला.
काय आहे प्रकरण ?
मेघालयतील रहिवासी असलेली द्रभामोन पाहवा ही मानवी तस्करीच्या आरोपाखाली फेब्रुवारी 2020 पासून तुरुंगात आहे. या महिलेला अटक केली तेव्हा ती गर्भवती होती. यानंतर तिने तुरुंगातच मुलाला जन्म दिला. विशेष म्हणजे, दोन वर्षे या प्रकरणाची सुनावणी झाली नाही.
न्यायालयाने काय म्हटले ?
आता या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, पक्षकारांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर असे दिसून आले की याचिकाकर्त्याला 18 महिने तुरुंगात राहावे लागले. यादरम्यान तिने बाळाला जन्मही दिला. एक मूल आहे, म्हणून आम्ही तिला जामीन देऊ शकतो. हा देण्याचा योग्य आधार विचारात घ्या.
महिलेला वेश्याव्यवसायात ढकलले
वकील सलमान खुर्शीद आणि टीके नायक या महिलेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात हजर होते. यावेळी ते म्हणाले की, महिलेला चांगली नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने दिल्लीत आणण्यात आले होते. त्यानंतर तिला जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले गेले. ही महिला स्वत:च वेश्याव्यवसाय करणाऱ्या टोळीची बळी ठरली आहे.
सर्वोच्च न्यायालयाला असेही सांगण्यात आले की, 18 महिन्यांच्या तुरुंगवासात या महिलेने तुरुंगात एका मुलाला जन्म दिला आणि ते मूलही तिच्या आईसोबत तुरुंगात आहे. या प्रकरणात दिल्ली सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी हजेरी लावत महिलेवरील कथित गुन्ह्यांची गंभीरता लक्षात घेऊन तिच्या याचिकेला विरोध केला होता.