२ लाख लाच घेताना अधीक्षक अभियंत्याला अटक; घरी धाड टाकताच कोट्यवधीचं घबाड सापडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 09:40 IST2024-12-19T09:39:54+5:302024-12-19T09:40:39+5:30
ज्यात जल जीवन मिशन योजनेतून केलेल्या कामाच्या मोबदल्यात अडीच कोटी थकबाकी होती. ही बिले पास करण्यासाठी अनिल कच्छावा यांनी ५ लाखांची लाच मागितली होती.

२ लाख लाच घेताना अधीक्षक अभियंत्याला अटक; घरी धाड टाकताच कोट्यवधीचं घबाड सापडलं
डूंगरपूर - राजस्थानच्या डूंगरपूर इथं २ लाखाची लाच घेताना अटक झालेल्या जल विभागाच्या अधीक्षक अभियंत्याच्या घरी अँन्टी करप्शन ब्यूरोने धाड टाकली. या धाडीत जवळपास साडे चार कोटींची संपत्ती असल्याचं उघड झालं. इतकेच नाही तर कुणालाही संशय नको यासाठी त्यांनी पत्नी आणि आईच्या नावे असलेल्या बँक खात्याचा वापर केला. त्याच्या नावावर २० हून अधिक बँक खाती आहेत. अनिल कच्छावा यांच्या घरी तपासात ९ लाख २२ हजार रोकड सापडली तसेच बँकेत १ कोटी ८७ लाखाचं फिक्स्ड डिपॉझिट असल्याचं समोर आले.
अनिल कच्छावा यांच्याकडे १ कोटी १६ लाख किंमतीचे २ निवासी प्लॉट आहेत. बँक खात्यात ८८ लाख रुपये जमा आहेत. एसीबीच्या टीमला संपूर्ण तपासात ४ कोटी १६ लाखांची मालमत्ता असल्याचं शोधले आहे. ACB चे अधिकारी विजय स्वर्णकार यांनी सांगितले की, आरोपी अनिल कच्छावा यांच्या महावीर नगर कोटा येथील घरी टाकलेल्या धाडीत ९ लाख २२ हजार रोकड, १.८७ कोटींची FD, १ कोटी १६ लाखांचे २ फ्लॅटचे कागदपत्रे आणि बँक खात्यांमधील ८८ लाख रक्कम सापडली आहे.
डूंगरपूरच्या जल विभागात अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत असलेले अनिल कच्छावा यांना २ लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली. त्यानंतर एसीबी डीजी रविप्रकाश मेहरडा यांच्या निर्देशावर पुढील कारवाई करण्यात आली. जल जीवन मिशन कामाचं बिल पास करण्यासाठी २ लाखांची लाच घेतली होती. त्यावेळी एसीबीने सापळा रचून त्यांना अटक केली. डूंगरपूर येथे एसीबी कार्यालयाला तक्रार प्राप्त झाली होती. ज्यात जल जीवन मिशन योजनेतून केलेल्या कामाच्या मोबदल्यात अडीच कोटी थकबाकी होती. ही बिले पास करण्यासाठी अनिल कच्छावा यांनी ५ लाखांची लाच मागितली होती.
या तक्रारीची एसीबी कार्यालयाने दखल घेत एक पथक नेमलं. त्यानंतर अधीक्षक अभियंत्याला ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी ५ लाखांऐवजी २ लाख देतो असं सांगून तक्रारदाराने भेटायला बोलावले. आरोपी अभियंता अनिल कच्छावा हे २ लाख घेण्यासाठी गेले असता त्यांनी लाच घेतल्यावर सापळा रचलेले एसीबी अधिकाऱ्यांनी त्यांना पकडले. याआधीही या अभियंत्याने अनेकांकडून लाच घेतल्याचं आता समोर येत आहे.