आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 06:01 IST2025-10-08T06:01:13+5:302025-10-08T06:01:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : आरक्षण , सरकारी नोकरी व आर्थिक लाभ या उद्देशाने दोन मयतांच्या नावे चिठ्ठी तर ...

आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : आरक्षण, सरकारी नोकरी व आर्थिक लाभ या उद्देशाने दोन मयतांच्या नावे चिठ्ठी तर आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या एकाच्या नावे लिहिलेली चिठ्ठी दुसऱ्याच अक्षरात निघाली. तपासात बिंग फुटले अन् तीन वेगवेगळ्या समाजातील प्रकरणांत मंगळवारी गुन्हा दाखल झाला.
दादगी (ता.निलंगा) येथे शिवाजी वाल्मिक मेळे (३२) यांचा १३ सप्टेंबरला करंट लागल्याने मृत्यू झाला. पंचनाम्यात चिठ्ठी मिळाली नव्हती. नंतर त्यांच्या घरातून चिठ्ठी मिळाली. ज्यात जात प्रमाणपत्र मिळत नसल्याचे म्हटले. १४ सप्टेंबरला अनिल बळीराम राठोड (२७, रा. हणमंतवाडी तांडा, ता. चाकूर) यांचाही करंट लागल्याने मृत्यू झाला. तिथेही नंतर एकाने पोलिसांकडे अशीच चिठ्ठी दिली. २६ ऑगस्टला बळीराम श्रीपती मुळे (३६, रा. शिंदगी ता. अहमदपूर) यांनी विषारी द्रव प्राशन केले. एका नातेवाईकाने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी सादर केली. त्यामध्येही आरक्षणाचा उल्लेख होता.
नेमका उलगडा कसा?
अहमदपूर, निलंगा, चाकूर ठाण्यांमध्ये दाखल प्रकरणांमध्ये मृत व्यक्ती तसेच आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे नैसर्गिक हस्ताक्षर आणि सादर झालेल्या चिठ्ठ्यांवरील हस्ताक्षर जुळले नाही.
त्यानंतर चाकूर पोलिसांनी हॉस्पिटलचे सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये चिठ्ठी लिहिणारी संशयित व्यक्ती निष्पन्न झाली. याच पद्धतीने तीनही प्रकरणातील संशयितांचे हस्ताक्षर नमुने तपासल्यानंतर शासकीय दस्ताऐवज परिक्षण विभागाकडे पाठविले. हस्ताक्षर जुळत नसल्याचे अहवालात समोर आले.
कोणी लिहिल्या चिठ्ठ्या?
जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या माहितीनुसार, आत्महत्येचा प्रयत्न केलेला बळीराम मुळे यांची चिठ्ठी चुलत भाऊ संभाजी उर्फ धनाजी भिवाजी मुळे याने लिहिली. मृत शिवाजी मेळेंबाबत चिठ्ठी माधव रामराव पिटले याने लिहिली. तर अनिल राठोड प्रकरणात चिठ्ठी शिवाजी फत्तू जाधव याने, नरेंद्र विठ्ठल जक्कलवाड व तानाजी मधुकर जाधव यांच्याशी संगनमत करून नरेंद्र जक्कलवाड यांच्याकडून लिहून घेतली.