Suicide of a married woman after she raped a blackmailed | बलात्कार करून ब्लॅकमेल करणाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
बलात्कार करून ब्लॅकमेल करणाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

सेनगाव (जि. हिंगोली) : पाच वर्षांपूर्वी गर्भवती महिलेवर बलात्कार करून तिघांनी त्याचा व्हिडीओ बनवला. त्याआधारे तिघे वारंवार ब्लॅकमेल करीत असल्याने विवाहितेने गुरुवारी घरीच गळफास घेऊन स्वत:ला संपविले.


तिने लिहिलेल्या चिठ्ठीत तीन आरोपींची नावे आहेत. त्यांच्यामुळेच आत्महत्या करीत असल्याचे त्यात म्हटले आहे. याप्रकरणी चंद्रभान गणपत कायंदे , परमेश्वर नारायण वावरे, सुरेश नामदेव कायंदे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून तिघेही फरार आहेत.


सेनगाव तालुक्यातील महिलेवर आरोपींंनी २२ डिसेंबर २०१५ ला तिच्या घरात घुसून अत्याचार केला होता. तेव्हा ती दोन महिन्यांची गर्भवती होती. आरोपींनी अत्याचाराचा व्हीडिओ तयार केला होता. कुटुंबियांना सांगितल्यास संसार उद्ध्वस्त होईल, अशी भीती तिला वाटत होती. त्यानंतरही आरोपी हा व्हीडिओ दाखवून तिची बदनामी करीत होते. २0१६ मध्ये तिला पुन्हा शरीरसुखाची मागणी करून आरोपींकडून त्रास दिला जात होता. शेवटी कंटाळून तिने सेनगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. त्याची सुनावणी अद्याप पूर्ण झाली नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. न्यायालयामध्येच इलेक्ट्रिक बोर्डात हात घालून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे न्यायालयात तिला माफीही मागावी लागली होती.

पोलिसांची टाळाटाळ
विवाहितेने तीन आरोपींविरुद्ध दिलेल्या तक्रारीचे प्रकरण सेनगाव पोलीस ठाण्यात दाखल होते. मात्र पोलिसांनी गांभीर्याने न घेतल्यानेच विवाहितेला आत्महत्या करण्याची वेळ आली, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

Web Title: Suicide of a married woman after she raped a blackmailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.