Sonali Phogat: सोनाली फोगाटच्या नावाने सांगवान चालवत होता रॅकेट; पोलिसांचा आणखी एक धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 13:34 IST2022-09-04T13:34:25+5:302022-09-04T13:34:43+5:30
सोनालीचा स्वीय सहाय्यक सुधीर सांगवान याचे बँक खाते बंधन बँकेत आहेत.

Sonali Phogat: सोनाली फोगाटच्या नावाने सांगवान चालवत होता रॅकेट; पोलिसांचा आणखी एक धक्कादायक खुलासा
पणजी: भाजप नेत्या व अभिनेत्री सोनाली फोगाट हिचा खून तिच्या स्वीय सचिवाने मालमत्ता हडप करण्यासाठीच केला, या शक्यतेला आता बळकटी मिळू लागली आहे. गोवा पोलिसांनी हरयाणामध्ये जाऊन सोनालीच्या बँक खात्यांची चौकशी सुरू केली आहे. बँक खात्यातून झालेल्या व्यवहारांची छाननी केली जात आहे. तिच्या स्वीय सचिवाच्याही बँक खात्याचा ताबा पोलिसांनी घेतला आहे.
सोनालीचा स्वीय सहाय्यक सुधीर सांगवान याचे बँक खाते बंधन बँकेत आहेत. सोनालीची मालमत्ता कुठे कुठे आहे याची माहिती पोलीस गोळा करत आहेत. तिची मालमत्ता हडप करण्यासाठीच तिला तिच्या स्वीय सहाय्यकाने अंमली पदार्थांचा अतिरिक्त डोस दिला असा पोलिसांना संशय आहे. पोलीस त्याचदिशेने अधिक तपास करत आहेत.
सोनालीचे धानधूर गावात फार्म हाऊस आहे. ते फार्म हाऊस ती सांगवानला दहा वर्षांसाठी लिजवर देणार होती. त्यासाठी त्याने ऑनलाईन अर्जही केला होता. मात्र ते लिज डीड प्रत्यक्षात होऊ शकले नव्हते. सोनालीचा खून झाल्यानंतर गोवा पोलीस मालमत्तेच्याच दृष्टीकोनातून अधिक चौकशी करत आहेत. तसेच सांगवान हा सोनाली फोगटच्या नावावर अवैध वसुली रॅकेट चालवत होता. यामध्ये त्याने अनेक लोकांकडून लाखो रुपये उकळले आहेत. सुधीर सांगवानने क्रिटिव्ह ऍग्रीटेक नावाच्या फर्मच्या आधारे कृषी कर्जाच्या नावाखाली अनेकांना लाखोंचा गंडा लावला आहे.
दरम्यान, सोनालीच्या कुटुंबीयांनी भारताच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहून कथित हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची विनंती केली आहे. आरोपींवर योग्य कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचेही कुटुंबीयांनी म्हटले आहे. खुनाच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रमुख संशयितांपैकी एक असलेल्या सुधीर सांगवानला सरकार पाठिंबा देत असल्याचा दावाही कुटुंबीयांनी केला आहे. गोवा पोलिसांनी केलेला तपास केवळ निमित्तमात्र असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
सोनालीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची नोंद झाल्यानंतर सोनाली फोगटची हत्या झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. फोगटचा भाऊ रिंकू ढाका याने सोनालीच्या हत्येचा आरोप करत एफआयआर दाखल केली. शवविच्छेदनानंतर केलेल्या प्राथमिक तपासावर ते समाधानी नव्हते. त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी पार्थिव हरियाणातील हिसार येथे नेण्यात आले. त्यानंतर पुढील तपासासाठी गोवा पोलिसांचे एक पथक हरयाणालाही गेले आहे. परंतु या तपासावर फोगोट यांचा पुतण्या विकास यांनी समाधानी नसल्याचे म्हटले आहे.