पालिका आयुक्तांच्या बंगल्यात चोरी, नवी मुंबईच्या माजी आयुक्तांचा लॅपटॉप पळवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 02:56 IST2019-08-17T02:55:35+5:302019-08-17T02:56:20+5:30
नेरुळ येथील पालिका आयुक्तांच्या बंगल्यात चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने स्वयंपाक खोलीच्या उघड्या खिडकीतून आत प्रवेश करून लॅपटॉप व एक मोबाइल चोरून नेला आहे.

पालिका आयुक्तांच्या बंगल्यात चोरी, नवी मुंबईच्या माजी आयुक्तांचा लॅपटॉप पळवला
नवी मुंबई : नेरुळ येथील पालिका आयुक्तांच्या बंगल्यात चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने स्वयंपाक खोलीच्या उघड्या खिडकीतून आत प्रवेश करून लॅपटॉप व एक मोबाइल चोरून नेला आहे. या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.
पालिका आयुक्तांच्या वास्तव्यासाठी असलेल्या बंगल्यात हा प्रकार घडला आहे. सद्यस्थितीला त्या ठिकाणी नुकतीच बदली झालेले पालिकेचे माजी आयुक्त रामास्वामी एन. हे सहकुटुंब त्या ठिकाणी वास्तव्याला आहेत. या बंगल्यातून गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान त्यांचा लॅपटॉप व एक मोबाइल चोरीला गेला.
लॅपटॉप हा त्यांच्या वैयक्तिक वापरातला असून, मोबाइल त्यांच्या नातेवाइकांचा आहे. शुक्रवारी सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी नेरुळ पोलिसांकडे तक्रार केली आहे. यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वयंपाक खोलीच्या खिडकीला ग्रिल बसवण्यात आलेले नाही, याचाच फायदा घेत गुरुवारी रात्री खिडकी उघडी राहिली असता, चोरट्याने आत प्रवेश केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चोरट्याने बंगल्याच्या मागच्या बाजूच्या संत गाडगेबाबा उद्यान (रॉक गार्डन)मधून बंगल्याच्या आवारात प्रवेश केल्याचाही अंदाज वर्तवला जात आहे. तर बंगल्यात ज्या ठिकाणी सीसीटीव्ही आहेत, त्या ठिकाणी चोरट्याने प्रवेश टाळलेला आहे. मात्र, उद्यानातील व भवतालच्या सीसीटीव्हीच्या तपासातून त्याचा उलगडा होऊ शकेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.