बहिणीला संदेश पाठविल्याने चाकूचा धाक दाखवत मोबाइलची केली चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 07:02 IST2022-02-21T07:02:14+5:302022-02-21T07:02:33+5:30
चाकूच्या धाकात मोबाइल घेऊन चोरटे पसार.

बहिणीला संदेश पाठविल्याने चाकूचा धाक दाखवत मोबाइलची केली चोरी
त्रिकुटाला अटक
मुंबई : रस्त्यावरून जाताना त्रिकुटाने हटकत बहिणीला संदेश का पाठवतो म्हणत धक्काबुकी केली. काही समजण्याच्या आतच चाकूच्या धाकात त्यांच्यासह मित्रांचे मोबाइल चोरल्याचा प्रकार मालाड परिसरात घडला. या प्रकरणी गुन्हे शाखेने तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे.
मालाड परिसरातून तक्रारदार १८ फेब्रुवारी रोजी दोन मित्रांसोबत जात असताना तीन अनोळखी तरुणांनी त्याला अडविले. बहिणीला फोनवरून मेसेज का करतो? असे म्हणत दमदाटी सुरू केली. चाकूच्या धाकात मोबाइल घेऊन ते पसार झाले. मात्र तक्रारदार तसेच त्यांच्या मित्रांपैकी कुणालाही संदेश केला नसल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, गुन्हे शाखेने याचा समांतर तपास सुरू केला.
घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, आरोपी हे थोड्या अंतरावर पळत जाऊन ऑटोरिक्षाने निघून गेल्याचे दिसून आले. त्यानंतर तांत्रिक तपास हे मालवणी, मालाड येथील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कक्ष ११ चे प्रभारी पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन गवस, मानसिंग पाटील, अभिजित जाधव, विशाल पाटील, अजित कानगुडे यांनी विविध पथके स्थापन करीत आरोपीला अटक केली. त्यांच्याकडून चोरी केलेले तीन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.
अटक आरोपी सराईत गुन्हेगार
अटक करण्यात आलेले त्रिकूट सराईत गुन्हेगार असून एका आरोपीविरोधात १५ गुन्हे नोंद आहेत. या प्रकरणी त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे.