खंडणीसाठी किडनॅपर्सनी चोरलं पाणीपुरीवाल्याचं सिम; शक्कल लढवली पण झाली पोलखोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 13:06 IST2025-01-13T13:05:45+5:302025-01-13T13:06:12+5:30
रुद्रचं अपहरण करणाऱ्या अपहरणकर्त्यांनी कोणालाही संशय येऊ नये म्हणून १० लाख रुपयांची खंडणी मागण्यासाठी पाणीपुरीवाल्याचं सिम कार्ड चोरलं होतं.

खंडणीसाठी किडनॅपर्सनी चोरलं पाणीपुरीवाल्याचं सिम; शक्कल लढवली पण झाली पोलखोल
श्रीगंगानगरमधील चिमुकला रुद्र शर्माच्या अपहरण प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. रुद्रचं अपहरण करणाऱ्या अपहरणकर्त्यांनी कोणालाही संशय येऊ नये म्हणून १० लाख रुपयांची खंडणी मागण्यासाठी पाणीपुरीवाल्याचं सिम कार्ड चोरलं होतं. आरोपीने त्या सिमचा वापर करून WhatsApp एक्टिव्ह केलं आणि रुद्रला सोडण्यासाठी १० लाख रुपयांची खंडणी मागितली. आरोपींच्या चौकशीदरम्यान ही बाब उघड झाली. आरोपीच्या या कल्पनेने पोलीसही हैराण झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेले आरोपी दीपक कुमार उर्फ दीपू (२०) आणि निखित उर्फ लकी (२०) हे हिंदूमलकोट पोलीस स्टेशन परिसरातील खाटवलना गावातील रहिवासी आहेत. दोघेही जवळचे मित्र आहेत. दीपूचे वडील श्री गंगानगरमध्ये स्टील वेल्डर म्हणून काम करतात तर लकीचे वडील टेम्पो चालवतात. दीपू रील्स बनवत राहतो आणि त्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत राहतो. दोघेही नुकतेच चंदीगडहून परतले होते. दोघांनाही आरामदायी जीवन जगण्याची इच्छा होऊ लागली.
ती इच्छा पूर्ण करण्यासाठी दोघांनीही पैशाची व्यवस्था करण्यासाठी एका मुलाचं अपहरण करण्याचा प्लॅन केला. यासाठी दोघेही श्रीमंत कुटुंबातील मुलाच्या शोधात होते. ७ जानेवारी रोजी, जेव्हा ते मुलाच्या शोधात इकडे तिकडे फिरत होता, तेव्हा त्यांना रामदेव कॉलनीतील घरासमोर रुद्र खेळताना दिसला. रुद्रशी बोलून ओळख वाढवली. त्यादिवशीच ते रुद्रचं अपहरण करण्याचा प्रयत्न करत होते. पण तिथे गर्दी असल्याने ते तसं करू शकले नाहीत. ८ जानेवारी रोजी पुन्हा तिथे गेले आणि रुद्रशी बोलले.
रुद्रला मोठी पतंग हवी होती. त्याने तशी इच्छा व्यक्त केली तेव्हा ते रुद्रला घेऊन बाईकवरून पळून गेले. नंतर पाणीपुरीवाल्याचं सिमकार्ड चोरून WhatsApp एक्टिव्ह केलं. मग त्यांनी रुद्रच्या परिसरातील जिम मालकाला फोन करून त्याच्या अपहरणाची माहिती दिली. आरोपी म्हणाले की, मुलगा आमच्या ताब्यात आहे, त्याच्या कुटुंबियांना कळवा. जर तुम्हाला मुलगा हवा असेल तर दहा लाख रुपयांची व्यवस्था करा.
रुद्रच्या आजोबांना याबद्दल माहिती मिळाली. त्यांनी पोलिसांना सांगितलं. नंतर श्रीगंगानगरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रघुवीर प्रसाद शर्मा हे रुद्रचे काका असल्याचं भासवून आरोपीशी सुमारे ५० वेळा बोलले. पोलिसांनी आरोपीला फोनवर व्यस्त ठेवले. याच दरम्यान, पोलिसांनी मोबाईल नंबरचं लोकेशन ट्रेस केलं. नंतर, अपहरणकर्त्यांना पकडण्यात आलं आणि रुद्रची सुखरूप सुटका करण्यात आली.