भोपाळ - मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या शाहजहानाबाद येथे मागील वर्षी २४ सप्टेंबरला ५ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी भोपाळ विशेष कोर्टाने मुख्य आरोपी अतुल निहाले याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याशिवाय या घटनेत आरोपीला मदत करणाऱ्या आई बसंती आणि बहीण चंचल यांनाही दोषी ठरवत २-२ वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. या निर्दयी घटनेनं शहरात खळबळ माजली होती.
२४ सप्टेंबर २०२४ रोजी शाहजहानाबाद येथील एका इमारतीत राहणारी ५ वर्षीय बेपत्ता झाली होती. पोलिसांनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा नोंद करत तपासाला सुरुवात केली. १०० हून अधिक पोलीस, डॉग स्क्वॉड, ड्रोनच्या मदतीने १ हजार पेक्षा अधिक फ्लॅटची झडती घेतली. अखेर ७२ तासांनी या मुलीचा मृतदेह त्याच इमारतीतील बंद फ्लॅटच्या टाकीत सापडला. पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये या मुलीसोबत बलात्कार झाल्याचं समोर आले. बलात्कारानंतर तिची गळा दाबून हत्या करण्यात आली होती.
फॉगिंगच्या धूराचा फायदा घेत केला गुन्हा
या घटनेचा तपास करताना समोर आले की, मुलीच्या घरासमोर राहणाऱ्या आरोपी अतुल निहाले याने महापालिकेच्या फॉगिंग मशीनच्या धूराचा फायदा घेत मुलीला त्याच्या खोलीत ओढलं. काही मिनिटांमध्ये त्याने मुलीवर बलात्कार केला आणि गळा दाबून हत्या केली होती. त्यानंतर तिचा मृतदेह पलंगावर ठेवला. काही वेळाने त्याची आई आणि बहीण कामावरून परतली तेव्हा त्यांना हे कळलं. त्यानंतर या तिघांनी मिळून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचं प्लॅनिंग केले. घरातील किचनच्या टाकीत मुलीचा मृतेदह कोंबून ते निघून गेले. जेव्हा या घरातून दुर्गंध बाहेर आला तेव्हा पोलिसांनी तपासणी केली आणि मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेतील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली.
'रेयर ऑफ रेयरेस्ट' खटला
विशेष न्यायाधीश कुमुदिनी पटेल यांनी या प्रकरणाला रेयर ऑफ रेयरेस्ट सांगत अतुल निहालेला फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर त्याची आई बसंती आणि बहीण चंचल यांना पुरावे मिटवणे, गुन्ह्यात मदत करणे यासाठी प्रत्येकी २ वर्षाची जेलची शिक्षा दिली आहे. या घटनेत तिन्ही आरोपी कोर्टात दोषी आढळले. शाहजहानाबादच्या या घटनेतर शहरात प्रचंड संताप उसळला होता. या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी लोकांनी केली होती. त्यामुळे हा खटला जलदगती न्यायालयात सुनावणी घेत सहा महिन्यात आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली आहे.