"सॉरी मम्मी-पापा, मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही'; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने तणावातून उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 14:55 IST2025-12-22T14:43:24+5:302025-12-22T14:55:00+5:30
छत्तीसगडमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीतीने तणावातून टोकाचे पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे.

"सॉरी मम्मी-पापा, मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही'; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने तणावातून उचललं टोकाचं पाऊल
Chhattisgarh Crime: "सॉरी मम्मी-पापा, मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही..." अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत एका २० वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने आपली जीवनयात्रा संपवली आहे. छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यातील एका नामांकित विद्यापीठात ही धक्कादायक घटना घडली असून, शैक्षणिक तणाव आणि आर्थिक ओझे या विवंचनेतून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मूळची झारखंडमधील जमशेदपूरची रहिवासी असलेली प्रिन्सी कुमारी ही रायगडमधील एका विद्यापीठात कॉम्प्युटर सायन्सच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. शनिवारी रात्री उशिरा पुंजीपथरा येथील विद्यापीठाच्या वसतिगृहातील स्वतःच्या खोलीत तिने आपले आयुष्य संपवले.
घरच्यांच्या फोनला उत्तर मिळेना अन्...
शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास प्रिन्सीच्या कुटुंबीयांनी तिला वारंवार फोन केला, मात्र तिने प्रतिसाद दिला नाही. काहीतरी चुकीचे घडल्याची भीती वाटल्याने कुटुंबीयांनी तत्काळ वसतिगृहाच्या वार्डनशी संपर्क साधला. वार्डन खोलीपाशी पोहोचली असता दरवाजा आतून बंद होता. खिडकीतून डोकावून पाहिले असता प्रिन्सी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. यामुळे एकच खळबळ उडाली.
पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली आहे, ज्यातून प्रिन्सीच्या मनातील भीती आणि संघर्ष समोर आला आहे. "मी आपल्या पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास सक्षम नाही. माझ्या शिक्षणासाठी पालकांनी जमा केलेले पैसे खर्च होत असल्याचा मला अपराधीपणा वाटत होता. अभ्यासाचा प्रचंड ताण आणि आर्थिक ओझ्यामुळे मी नैराश्यात आहे," असं तिने चिठ्ठीत लिहिले आहे.
अभ्यासाचा मानसिक दबाव
मिळालेल्या माहितीनुसार, प्रिन्सीचे पहिल्या सेमिस्टरचे पाच विषय बॅकलॉग होते. तिला दुसऱ्या वर्षाच्या परीक्षांसोबतच हे जुने विषयही सोडवायचे होते, ज्याचा तिच्यावर मोठा ताण होता. काही दिवसांपूर्वीच तिने सेमिस्टर फीसाठी पालकांकडे १ लाख रुपयांची मागणी केली होती. पालकांनी पैसे दिले, मात्र कुटुंबाची ओढाताण होत असल्याची जाणीव तिला सतत सतावत होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, त्यानंतर तो कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला. पोलीस आता वसतिगृहातील इतर विद्यार्थी आणि विद्यापीठ प्रशासनाचे जबाब नोंदवत आहेत.