सोलापूर - बीडमधील मस्साजोग सरपंचाची निर्घृण हत्या केल्याची घटना २०२४ मध्ये घडली होती. त्याचप्रकारे शरणू हांडे यांना हाल हाल करून, अपमानित करून त्यांचा व्हिडिओ काढण्याचा आरोपींचा विचार होता. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही घटना टळली. यात शरणू हांडे यांचे डोक्यावरील, चेहऱ्यावरील केस ट्रीमरच्या सहाय्याने काढून त्यांना साडी आणि ब्लाऊज नेसवत माफी मागण्यास लावून त्यांच्यावर अनैसर्गिक कृत्य करायचे होते अशी धक्कादायक माहिती सूत्रांनी लोकमतला दिली आहे.
पोलिसांनी आरोपींच्या गाडीचा पाठलाग करून शिताफीने त्यांना पकडले. त्यांनी ही गाडी पुण्यातून भाड्याने घेतली होती. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सर्वांना एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणले. गाडीतील वस्तू पाहिल्यानंतर पोलिसही चक्रावले. या गाडीत आरोपींनी एक साडी, ब्लाऊज, निरोधाचे पाकीट, फटाक्यांसह सत्तूर जप्त केले. याबाबत विचारणा केल्यानंतर आरोपींनी शरणू यांचे केस काढून साडी नेसवण्यात येणार होती. शिवाय फटाके त्यांच्या गुद्व्दारात ठेवून फोडण्यात येणार होते. शिवाय यावेळी अनैसर्गिक कृत्य करून त्यावेळचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर किंवा लाईव्ह करण्याची त्यांची तयारी होती. असे क्रूरपणे हाल करणार असल्याचे सांगितले. हे ऐकून पोलिसही चक्रावून गेले.
मला मारुन टाकण्याचा चौघांचा विचार होता - शरणू
मला सायंकाळी पाचच्या सुमारास अपहरण केल्यानंतर पायाला मारून जखमी केलं. त्यावेळी गाडीमध्ये सात जण होते. यातील तिघांच्या मते मला ठार मारायचे नव्हते, बाकीचे मला मारण्यावर ठाम होते. निंबाळ परिसरात गेल्यानंतर तिथे गाडीत सीएनजी भरली. तेथून पुढे जात असतानाच काही अंतरावर गाडी बंद पडली. त्यानंतर अमित सुरवसे यांने इतरांना पळण्यास सांगितले. त्यानंतर अमितने व्हिडीओ कॉल करून रोहित पवार यांना माझी जखम दाखविली. मला माफी मागण्यास सांगितले, पण मी माफी मागितली नाही. यामुळे याला काम दाखव म्हणून फोन कट केलं, असे शरणू हांडे यांनी माध्यमांना सांगितले.
पोलिसांच्या पथकाने १४० च्या स्पीडने पाठलाग करत केली शरणूची सुटका
आमदार गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता शरणू हांडे यांना अपहरणकर्त्यांनी कारमध्ये घालून गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अक्कलकोटच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर आरोपी हे पुन्हा कर्नाटकातील इंडी तालुक्यातील होर्ती गावाकडे गेले. हे गाव सोलापूरपासून जवळपास ७० किलोमीटर अंतरावर आहे. पोलिसांनी पाठलाग सुरू केला तेव्हा आरोपी आणि पोलिसांच्या गाडीमध्ये जवळपास ६० किलोमीटरचे अंतर होते. यासाठी पोलिसांनी तब्बल १२० ते १४० किलोमीटर ताशी वेगाने आरोपींच्या गाडीचा पाठलाग करून गुरुवारी रात्री हांडे यांना सुरक्षितरीत्या वाचवले. अपहरण केल्यानंतर अमित सुरवसे, सुनील पुजारी, दीपक मेश्राम, अभिषेक माने व अन्य आरोपी हे एकाच कारमधून जात होते. तेव्हा त्यांना पोलिस पाठलाग करत असल्याची माहिती नव्हती. ते रस्त्यात शरणूचा छळ करत जात होते. निंबाळ गावाजवळ आरोपींनी गाडी बाजूला घेत त्याचा अतोनात छळ केला. त्यानंतर ते पुढच्या दिशेने रवाना झाले. यावेळी गाडीतील काही आरोपी खाली उतरल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानंतर इंडीलाजवळ जाऊन यूटर्न घेऊन सुनसान जागा शोधत होते.
त्याचवेळी गुन्हे शाखेचे एक पथक आणि एमआयडीसी पोलिसांचे एक पथक असे दोन पथक आरोपींचा पाठलाग करतच होते. नांदणी टोल नाका लागला, पण एका गाडीवर पोलिसांचा दिवा होता, दुसऱ्या खासगी गाडीतील पोलिसांनी लगेच ओळखपत्र दाखवल्याने त्या गाड्यांना टोल नाक्यावर लगेच मार्ग मिळाला. त्यानंतर गाडी सुसाट वेगाने आरोपींच्या गाडीच्या दिशेने निघाली. यामुळे पोलिस आणि आरोपींच्या गाडीदरम्यान जेमतेम एक ते दोन किलोमीटर अंतर असताना आरोपींची गाडी बंद पडली. यामुळे आरोपींनी बंद गाडी ढकलत काही मीटर अंतर दूर नेऊन अंधारात थांबविली. त्यावेळी आरोपींना शंका आल्याने इतर आरोपी तेथून पळाले. मुख्य आरोपी अमित सुरवसे मात्र तेथेच थांबून शरणूला बाहेर खेचत होता. त्याला ताब्यात घेतले.