"कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 19:30 IST2025-06-05T19:29:20+5:302025-06-05T19:30:15+5:30
ऑक्टोबर २०२४ रोजी आशाराणीला सासरच्या लोकांनी हाकलून दिल्याने ती मुलीला घेऊन रायचूरला आली होती. त्यानंतर आई वडिलांनी तिला थोड दिवस ठेवून घेतले

"कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच..."
सोलापूर - पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर सोलापूरातही सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या केल्याच्या घटनेने सोलापूर हादरलं आहे. मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाटी येथील आशाराणी भोसले हिने जीवन संपवलं. या घटनेनंतर आशाराणीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. कारसाठी पैशाची मागणी करत तिचा छळ केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
चारचाकी वाहन घेण्याकरिता आणि इतर खर्चासाठी माहेरून पैसे घेऊन ये, तुला नीट स्वयंपाक करता येत नाही. नवऱ्याची इज्जत करत नाही असं म्हणून वारंवार मानसिक आणि शारिरीक त्रास देऊन तिचा छळ करण्यात आला. तिने त्रासाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे. ऑक्टोबर २०२४ रोजी आशाराणीला सासरच्या लोकांनी हाकलून दिल्याने ती मुलीला घेऊन रायचूरला आली होती. त्यानंतर आई वडिलांनी तिला थोड दिवस ठेवून घेतले. सासरी असताना पतीने उलट आशाराणी हिच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली होती.
पहिली मुलगी, दुसरीला पाडले, तिसरीपूर्वीच आत्महत्या
आशाराणी हिला पहिली मुलगी झाली. सासरच्या लोकांना मुलगा हवा होता. मुलगी झाल्याने सासरच्या लोकांनी आशाराणी हिला त्रास देण्यास सुरुवात केली. दुसऱ्यावेळी प्रेग्नेंट असताना मुलगी आहे असं कळल्याने तिला ढकलून देऊन त्या बाळास संपवले. त्यानंतरही ती पुन्हा गर्भवती होती, ३ महिने झाले होते. पुन्हा मुलीचा संशय असल्याने सासरच्या लोकांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. पत्नी नांदण्यास येत नाही म्हणून पतीने तक्रार केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी आशाराणी हिस १० जानेवारी २०२५ रोजी घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर पोलिसांसमोर हजर झाल्यानंतर समुपदेशन केल्यानंतर दोघांनीही एकत्र नांदण्यास होकार दिला. त्यानंतर ३-४ महिन्यात ही घटना घडली असं नातेवाईकांनी म्हटलं.
११ फूट उंचीवर ती फाशी कशी घेऊ शकते?
आशाराणी हिने आत्महत्या केली नाही, तिचा खून करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. ११ फूट उंचीवर ती फाशी कशी घेऊ शकते? दोरीला चार गाठी आहेत, तिच्या चेहऱ्यावर जखमा आहेत असे एक ना अनेक आरोप करत नातेवाईकांनी ही आत्महत्या नव्हे तर हत्याच असल्याचे माध्यमांना सांगितले.