Snatching With Pm Modi Niece, 700 Policemen Involves In Investigation | नरेंद्र मोदींच्या पुतणीची पर्स हिसकावणाऱ्यांना अटक करण्यासाठी 700 पोलीस 
नरेंद्र मोदींच्या पुतणीची पर्स हिसकावणाऱ्यांना अटक करण्यासाठी 700 पोलीस 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुतणी दमयंतीबेन मोदी हिची पर्स हिसकावून चोरटे पसार झाल्याची घटना गेल्या शनिवारी घडली होती. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पर्स हिसकावणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी अटक केली. तसेच, त्यांच्याकडून सर्व साहित्य जप्त केले.  

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हायप्रोफाइल प्रकरणाचा तपास करण्यासाठी 700 पोलीस कर्मचारी कामाला लागले होते. अटक करण्यात आलेल्या चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले होते. त्यानुसार, रुट मॅप चेक करत पोलिसांनी जवळपास 200 सीसीटीव्ही फुटेज पडताळून पाहिले. त्यांनतर हरयाणातील सोनीपतमध्येही जाऊन एका चोरट्याला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपी गौरव याला सोनीपतमधून अटक केली. तर दुसरा आरोपी आकाश याला सुल्तानपुरीमधून पोलिसांनी अटक केली. आकाश याच्याकडून पोलिसांनी दमयंती बेन मोदी यांची पर्स आणि मोबाईल जप्त केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावाची मुलगी दमयंतीबेन मोदी शनिवारी सकाळी अमृतसरहून दिल्लीला आल्या होत्या. दमयंती सिव्हील लाइन्स परिसरात असलेल्या गुजराती समाज भवनमध्ये राहणार होत्या. जुन्या दिल्लीहून ऑटो पकडून त्या आपल्या कुटुंबासोबत गुजरात समाज भवनला पोहोचल्या. त्याचवेळी ऑटोतून उतरत असताना स्कूटीवरून दोन जण आले आणि त्यांनी दमयंती यांची पर्स हिसकावून नेली होती.

दमयंती यांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्समध्ये जवळपास 56 हजार रुपयांची रोख रक्कम, दोन मोबाईल आणि महत्त्वाची कागदपत्रे होती. या घटनेनंतर दिल्लीतील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तसेच, यावरुन दिल्लीत राजकारणही सुरु झाले होते. भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी दिल्लीत घुसखोरी करणाऱ्यांनी चोरी केल्याचा आरोप केला होता. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मनोज तिवारी यांना प्रत्युत्तर देत दोषी बाहेरचा असो किंवा दिल्लीतील, सर्वांना शिक्षा मिळालीच पाहिजे, असे म्हटले होते. 
 


Web Title: Snatching With Pm Modi Niece, 700 Policemen Involves In Investigation
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.