Slum grandfather panic in APMC area; The hut was set on fire to avoid arrest | एपीएमसी परिसरात झोपडपट्टी दादाची दहशत; अटक टाळण्यासाठी झोपडी जाळली

एपीएमसी परिसरात झोपडपट्टी दादाची दहशत; अटक टाळण्यासाठी झोपडी जाळली

नामदेव मोरे

नवी मुंबई : एपीएमसी परिसरामध्ये इम्रान खान या झोपडपट्टी दादाने प्रचंड दहशत निर्माण केली आहे. २९ नोव्हेंबरला एका तरुणावर खुनी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आहे. अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकालाही विरोध करून परत पाठविले. अटक टाळण्यासाठी झोपडीला आग लावली. नागरिकांनी प्रसंगावधान दाखविल्यामुळे झोपडीमधील दोन मुलांचा जीव वाचविता आला. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य मार्केटच्या समोरील बाजू रेल्वे यार्ड यांच्यामध्ये असलेल्या भूखंडांवर अनधिकृतपणे झोपड्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. या परिसरात इम्रान खान याची प्रचंड दहशत आहे. झोपड्या बांधून त्यांची विक्री करणे, वीजपुरवठा चोरून झोपड्यांना पुरविणे व तेथील रहिवाशांनी वीजबिलांच्या नावाखाली पैसे वसूल करणे व इतर अनेक गैरव्यवहार सुरू आहेत. रविवारी वाशी गाव येथे राहणारा तरुण उदय पटेल हा मयूर वाॅटर सप्लाय कंपनीचा ट्रक दुरुस्त करण्यासाठी सलीम ऑटो गॅरेजमध्ये गेला होता. त्यावेळी इम्रान, त्याचा साथीदार समीर खान व सलीम खानसह इतरांनी पटेल याला बेदम मारहाण केली. लोखंडी रॉडने डोक्यावर, पाठीवर व इतर ठिकाणी वार केले. गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. ही घटना समजल्यानंतर पोलीस कारवाईसाठी घटनास्थळी गेल्यानंतर, इम्रानने बेकायदेशीरपणे जमाव जमवून पोलिसांच्या कामामध्येही अडथळे निर्माण केले. पोलीस पथकाला कारवाई करू दिली नाही.

पाेलिसांनी अटक करू नये, यासाठी रॉकेलची कॅन घेऊन जाळून घेण्याची धमकी दिली. शेजारील झोपडीवर रॉकेल टाकून पेटवून दिली. झोपडीमध्ये दोन मुले झोपली होती. त्यांची आई कडी लावून कामानिमित्त बाहेर गेली होती. झोपडी जळू लागल्यानंतर महिला घटनास्थळी आल्यानंतर मुले आतमध्येच असल्याचे लक्षात आले. प्रसंगावधान राखून त्या मुलांना बाहेर काढले व आग विझविली म्हणून मोठी दुर्घटना टळली. आग विझविली नसती, तर परिसरातील इतर झोपड्याही जळून खाक झाल्या असत्या. या गोंधळाचा गैरफायदा घेऊन आरोपी घटनास्थळावरू पळून गेला असून, त्याचा शोध सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास रामुगडे हे स्वत: या प्रकरणाचा तपास करत आहेत.

गुन्ह्यांची मालिका
बाजारसमितीजवळील ग्रीन पार्क झोपडपट्टी परिसरात इम्रान याची अनेक वर्षांपासून दहशत आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न, मारामारी, शस्त्राचा वापर व इतर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर कडक कारवाई करावी व या परिसरातून तडीपार करण्यात यावे, अशी मागणी होऊ लागली आहे. दहशतीमुळे त्याच्या विरोधात कोणीही आवाज उठवत नाही.

भूखंडावर अतिक्रमण
या परिसरातील सिडकोच्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. इम्रान व त्याचे सहकारी झोपड्या बांधून त्यांची २० ते ५० हजार रुपयांमध्ये विक्री करत आहेत. या झोपड्यांना बेकायदेशीरपणे पाणी व वीजपुरवठाही केला जात आहे. वीजबिलाच्या नावाखाली प्रत्येक महिन्याला हजारो रुपये वसूल केले जात आहेत. येथील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचीही मागणी केली जात आहे.

महावितरणचेही दुर्लक्ष
सर्वसामान्य नागरिकांनी दोन महिन्यांचे वीजबिल थकविले, तरी महािवतरणचे कर्मचारी वीजपुरवठा खंडित करतात, परंतु ग्रीन पार्क झोपडपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात वीजचोरी सुरू असूनही संबंधितांवर गुन्हे दाखल केेले जात नाहीत. महावितरण, महानगरपालिका, पोलीस, सिडको अधिकारी, कर्मचारी दुर्लक्ष करत असल्यामुळे झोपडपट्टी दादांची दहशत वाढली असल्याचे मतही नागरिक व्यक्त करत आहेत.  

 

Web Title: Slum grandfather panic in APMC area; The hut was set on fire to avoid arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.