A six-year-old boy was strangled to death for having an affair | अनैतिक संबंध बघितल्याने सहा वर्षीय बालकाची गळा आवळून हत्या 

अनैतिक संबंध बघितल्याने सहा वर्षीय बालकाची गळा आवळून हत्या 

ठळक मुद्देचोवा नाल्यावरील पुलाजवळ रस्ता निर्मनुष्य असल्याचे पाहून गळा आवळून विहानचा खून केला. या घटनेची माहिती होताच सर्वत्र एकच खळबळ उडाली. 

भंडारा : अनैतिक संबंध बघितल्याने एका सहा वर्षीय बालकाचे अपहरण करुन गावापासून ७० किमी दूर एका निर्जनस्थळी गळा आवळून हत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. मोहाडी तालुक्यातील सालेबर्डी येथील हा बालक असून त्याचा खून भंडारा तालुक्यातील चोवा नाल्याजवळ करण्यात आला. याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.

नीलेश चंदन गजभिये (२३) रा.सालेबर्डी ता.मोहाडी असे आरोपीचे नाव आहे. रविवार २२ नोव्हेंबर रोजी विहान अचानक घरुन बेपत्ता झाला होता. शोध घेऊनही तो आढळून आला नाही. त्यामुळे मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी घटनास्थळ गाढले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, आंधळगावचे ठाणेदार सुभाष बारसे यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. परंतु विहानचा थांगपत्ता लागत नव्हता. दरम्यान मंगळवारी गावातील नीलेश गजभिये या तरुणाला संशयावरुन ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता त्याच्या बयाणात तफावत जाणवत होती. त्यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता विहानचा खून केल्याची कबुली दिली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह भंडारा तालुक्यातील पहेला जंगलातील चोवा नाल्यावरील पुलात फेकल्याचे सांगितले.

अपहरण करुन केला खून

चिमुकल्या विहानने नीलेशचे असलेले अनैतिक संबंध रविवारी बघितले होते. त्यामुळे आपली गावात बदनामी होईल यामुळे त्याने विहानला ठार मारण्याचा कट रचला. रविवारी दुपारी २.३० वाजता मोबाईल दाखविण्याच्या उद्देशाने त्याला मोटारसायकलवर बसविले आणि थेट भंडारा येथे आणले. तेथून तो विहानला घेऊन पहेला जंगलात गेला. चोवा नाल्यावरील पुलाजवळ रस्ता निर्मनुष्य असल्याचे पाहून गळा आवळून विहानचा खून केला. या घटनेची माहिती होताच सर्वत्र एकच खळबळ उडाली. 

Web Title: A six-year-old boy was strangled to death for having an affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.