ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 10:42 IST2025-07-20T10:41:37+5:302025-07-20T10:42:23+5:30
अमली पदार्थ विक्रीसाठी उल्हासनगर, डोंबिवली, कळवा, मुंब्रा येथे आलेल्या सहाजणांना अटक करण्यात आली.

ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
ठाणे : अमली पदार्थ विक्रीसाठी उल्हासनगर, डोंबिवली, कळवा, मुंब्रा येथे आलेल्या सहाजणांना अटक करण्यात आली. या आरोपींकडून १५७.३ ग्रॅम एमडी पावडर, ४१ किलो ९७४ ग्रॅम गांजा, असा एकूण ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केल्याचे ठाणे पोलिस दलाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने सांगितले.
उल्हासनगर, भाल गुरुकुल हायस्कूलजवळ ‘एमडी’ पावडरसह जय रेवगडे आणि साहिल कांगणे यांना अटक करण्यात आली. रेवगडे याच्याकडून ६३.६ ग्रॅम वजनाची ‘एमडी’ पावडर जप्त केली असून, त्या पावडरची किंमत १२ लाख ७२ हजार रुपये आहे. कांगणेकडून ४ लाख ३० रुपयांचे २१.५ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली. डोंबिवलीत ७ जुलै २०२५ रोजी केलेल्या कारवाईत कल्पेश निंबाळकर याला ताब्यात घेऊन ११ लाख ४४ हजार रुपयांची ५७.२ ग्रॅम वजनाची एमडी पावडर आणि आशिष आंबोकर याच्याकडून ३ लाखांची १५ ग्रॅम ‘एमडी’ पावडर जप्त करण्यात आली.
दरम्यान, १५ जुलै रोजी कळव्यातून ओडिसाच्या राजेंद्र महंत (२९) याला ४० किलो ५४० ग्रॅमच्या गांजासह अटक केली. या गांजाची किंमत १२ लाख १६ हजार २०० रुपये आहे. १७ जुलै रोजी मुंब्र्यातील अमृतनगर येथे शोएब युसूफ शेख (३२) याच्याकडून ४३ हजार २० रुपयांचा १ किलो ४३४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या सर्व कारवायांप्रकरणी अनुक्रमे हिललाईन, मानपाडा, कळवा पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. या तस्करी प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे? याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.