बिल्डर फसवणूक प्रकरणात SIT ने केली पाच जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2022 19:29 IST2022-11-04T19:27:19+5:302022-11-04T19:29:54+5:30

महापालिकेच्या खोट्या सही-शिक्क्यांचा केला वापर

SIT arrests five people in builder fraud case | बिल्डर फसवणूक प्रकरणात SIT ने केली पाच जणांना अटक

बिल्डर फसवणूक प्रकरणात SIT ने केली पाच जणांना अटक

मुरलीधर भवार, कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून बांधकाम परवानगी मिळविल्याचे भासवून रेरा प्राधिकरणाकडून बांधकाम नोंदणी प्रमाणपत्र मिळविल्या प्रकरणी पाच जणांना एसआयटीने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये प्रियंका सिताराम रावराणे, प्रवीण सिताराम ताम्हणकर, राहूल बाबूराव नवसागरे, जयदीप भागीनाथ त्रिभूवन आणि कैलास ज्ञानदेव गावडे यांचा समावेश आहे.

महापालिकेच्या खोट्या सही शिक्क्याचा वापर करुन महापालिकेने परवानगी दिल्याचे भासविले. या खोटय़ा परवानग्या रेराला सादर करुन त्यांच्याकडून प्रमाणपत्र मिळविले. हे प्रकरणी वास्तू विशारद संदीप पाटील यांनी माहिती अधिकारात उघडकीस आणले. त्यांनी या प्रकरणात महापालिकेकडे चौकशीची मागणी केली. तसेच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. महापालिकेने या प्रकरणात तक्रार दिल्याने डोंबिवलीतील दोन पोलिस ठाण्यात फसवणूक प्रकरणी ६५ बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. हे प्रकरण गंभीर असल्याने पोलिस आयुक्तांनी तपासकामी एसआयटी नेमली.

एसआयटीने ६५ पैकी ४० बिल्डरांची बँक खाती नुकतीच गोठविली आहे. दरम्यान रेराने देखील ६५ पैकी ५२ जणांच्या परवानग्या रद्द केल्या आहेत. या प्रकरणात ईडीने माहिती मागविली होती. तसेच एसआयटीने जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना सूचीत करुन माहिती मागितली आहे. आत्ता एसआयटीने पाच जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या पाच जणांनी खोटय़ा सही शिक्क्याच्या आधारे महापालिकेची खोटी परवानगी भासविली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Web Title: SIT arrests five people in builder fraud case