सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 20:37 IST2025-12-19T20:35:55+5:302025-12-19T20:37:02+5:30
'ज्युडिशियल कॅनिंग' ही एक शारीरिक शिक्षा आहे, ज्यामध्ये रॅटनच्या (वेताच्या) काठीने गुन्हेगाराला फटके मारले जातात.

सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
ऑनलाइन फसवणूक आणि इंटरनेटवरील घोटाळ्याच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी सिंगापूर सरकारने अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. ३० डिसेंबरपासून नवीन कायद्यानुसार, सायबर फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांना केवळ तुरुंगवास आणि दंडच नव्हे, तर आता चक्क अनिवार्यपणे 'चाबकाचे फटके' (Caning) मारण्याची शिक्षा दिली जाणार आहे.
कशासाठी किती चाबकाचे फटके?
सिंगापूर सरकारने गेल्या महिन्यात गुन्हेगारी कायद्यात दुरुस्ती केली. नवीन नियमांनुसार, स्कॅमर्स, एजंट आणि फसवणूक करणाऱ्या सिंडिकेटच्या सदस्यांना प्रत्येकी कमीतकमी ६ ते जास्तीतजास्त २४ चाबकाचे फटके मारले जातील. जे लोक जाणूनबुजून आपले बँक खाते किंवा वैयक्तिक माहिती मनी लाँड्रिंग किंवा फसवणुकीसाठी वापरण्यासाठी देतील, त्यांना १२ चाबकाच्या फटक्यांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.
सरकारने हा निर्णय का घेतला?
सिंगापूरच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण गुन्ह्यांपैकी ६०% गुन्हे हे केवळ फसवणुकीचे आहेत. २०२० ते २०२५ च्या पहिल्या सहामाहीपर्यंत सुमारे १.९ लाख फसवणुकीची प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात नागरिकांचे सुमारे ३.७ अब्ज सिंगापूर डॉलर्सचे नुकसान झाले आहे. ही परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून सरकारने गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण करण्यासाठी शारीरिक शिक्षेचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे.
काय असते 'कॅनिंग' (Caning) शिक्षा?
सिंगापूरमध्ये 'ज्युडिशियल कॅनिंग' ही एक शारीरिक शिक्षा आहे, ज्यामध्ये रॅटनच्या (वेताच्या) काठीने गुन्हेगाराला फटके मारले जातात. ही शिक्षा साधारणपणे ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या पुरुषांना दिली जाते. गंभीर स्वरूपाचे गुन्हे, बलात्कार आणि चोरी यांसारख्या प्रकरणांत ही शिक्षा आधीपासूनच लागू होती, आता तिचा समावेश सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यातही करण्यात आला आहे.
फिशिंग स्कॅम, बनावट नोकरीचे आमिष, ई-कॉमर्स फ्रॉड आणि गुंतवणुकीच्या नावाखाली होणारी फसवणूक हे सिंगापूरमधील प्रमुख स्कॅम्स आहेत. आता नवीन कायद्यामुळे अशा गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.