पुण्यात व्यापाऱ्यांवर गोळीबार, पोलीस तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 23:39 IST2021-02-14T23:39:42+5:302021-02-14T23:39:59+5:30
Crime News : या गोळीबारामागील कारण अजून समजले नसून भारती विद्यापीठ पोलीस तपास करीत आहे.

पुण्यात व्यापाऱ्यांवर गोळीबार, पोलीस तपास सुरू
धनकवडी : दत्तनगर चौकामध्ये एका व्यापाऱ्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना रविवारी (दि.१४) रात्री दहा वाजता घडली. विशाल प्रल्हाद पंजाबी, (वय ३६) यांच्या डोक्याला गोळी चाटून गेल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलीस दाखल झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे बालाजी ट्रेनिंग कंपनी या नावाने असलेल्या किराणा दुकानात तिघे भाऊ काम करतात. त्यांच्यामधील मधला भाऊ विशाल दुकानात असताना दोन जण दुकानात आले. त्यांच्यापैकी एकाने पिस्तूल बाहेर काढले. यावेळी विशाल हे चोर चोर असे ओरडू लागल्याने दुकानातील दोन कामगार बाहेर आले. यामधील प्रजापती हात गाडी घेऊन आले.
दरम्यान, त्याने पिस्तूलातुन गोळीबार केला आणि गाडी घेऊन पसार झाले. या गोळीबारामागील कारण अजून समजले नसून भारती विद्यापीठ पोलीस तपास करीत आहे.