चोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 17:47 IST2018-10-19T17:46:57+5:302018-10-19T17:47:15+5:30
काही कामगारांना हा तरुण काल दुपारी ३.३० वाजताच्या सुमारात १४ मजल्यावरील क्रेनच्या टोकावर उभा असलेला दिसला. त्यावेळी त्याने आपल्या इतर सहकाऱ्यांना आणि कंत्राटदारास याबाबत सांगितले. लागलीच कंत्राटदाराने पोलिसांना आणि अग्निशामक दलाला पाचारण करून या तरुणाचा जीव वाचविला आहे.

चोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई - अंधेरी पूर्व येथील सहार रोडवरील एका उंच इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या ठिकाणी शोले स्टाईल फिल्मी ड्रामा काल दुपारी ४५ मिनिटे रंगला होता. काल दुपारी दसऱ्यानिमित्त सर्व कामगारांना सुट्टी देण्यात आली होती. मात्र, मूळचा झारखंडचा असणारा आणि याच बांधकामाच्या ठिकाणी काम करणारा हा तरुण क्रेनवर चढला. या तरुणावर सहकारी कामगाराने पैसे चोरीचा आळ घेतल्याने निराश झालेल्या या तरुणाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. काही कामगारांना हा तरुण काल दुपारी ३.३० वाजताच्या सुमारात १४ मजल्यावरील क्रेनच्या टोकावर उभा असलेला दिसला. त्यावेळी त्याने आपल्या इतर सहकाऱ्यांना आणि कंत्राटदारास याबाबत सांगितले. लागलीच कंत्राटदाराने पोलिसांना आणि अग्निशामक दलाला पाचारण करून या तरुणाचा जीव वाचविला आहे.
हा तरुण क्रेनवर जवळ जवळ ४५ मिनिटे उडी मारण्याची धमकी देत उभा होता. खाली जमलेल्या सर्व लोक त्याला उडी न मारण्याची विनवणी करत होते. मात्र त्या मुलाने उडी मारली आणि पुढच्या क्षणी आपला निर्णय बदलत क्रेनला घट्ट पकडले. अखेर क्रेनच्या टोकाचा काही भाग हाताने घट्ट पकडता आल्याने तो खाली न पडता लटकून राहिला. हाताने क्रेन पकडून पाय खाली लोंबकळत काही काळ लटकून होता. त्यानंतर बऱ्याच प्रयत्नांनंतर तो पुन्हा क्रेनवर चढला आणि त्याचा मरता मरता जीव वाचला.