धक्कादायक! वकील राहिला मंत्र घाेकत, मांत्रिक पळाला रोकड घेऊन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 13:38 IST2025-07-24T13:38:20+5:302025-07-24T13:38:39+5:30
सीबीडी येथील वकिलाला काशीच्या एका मांत्रिकाने २० लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे.

धक्कादायक! वकील राहिला मंत्र घाेकत, मांत्रिक पळाला रोकड घेऊन
सूर्यकांत वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : पैशांच्या हव्यासापोटी अनेकजण गैरमार्गांचा अवलंब करतात. मात्र, पैशांचा पाऊस पाडून घेण्याचा असा प्रत्येक प्रयत्न हा फसलेला असून, त्यात जीवित किंवा वित्तहानीचीच उदाहरणे डोळ्यांसमोर आहेत. यानंतरही उच्च शिक्षितांमध्येही मंत्र-तंत्र, जादूटोणा याविषयी अद्यापही श्रद्धा पाहायला मिळत आहे. त्यातूनच सीबीडीतील एका वकिलाने तब्बल २० लाखांची रोकड गमावली; तर एका प्रकरणात जावयाने अघोरी पूजेच्या नावाखाली सासू व पत्नीला निर्वस्त्र करून त्यांचे फोटो व्हायरल केल्याचाही प्रकार घडला आहे. त्यावरून अद्यापही समाजात काळी जादू, पैशांचा पाऊस यांकडे असलेला कल दिसून येत आहे.
सीबीडी येथील वकिलाला काशीच्या एका मांत्रिकाने २० लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. या वकिलाची देवाधर्मावर असलेली श्रद्धा ओळखून भोंदूने त्याला गळाला लावले. सीबीडीत राहणारे वकील गतवर्षी सहकुटुंब काशी येथे देवदर्शनाला गेले होते. परत येताना त्यांची रेल्वेत पुष्पेंद्र तिवारी नावाच्या साधूची भेट झाली. त्याने वकिलाबद्दल काही भाकीत करून भविष्य उज्ज्वल करण्यासाठी उपाय सुचवले. यावरून वकिलाने पुष्पेंद्र साधूला सीबीडीतील घरी आणले असता, त्याने घरात बाधा असल्याचे सांगितले. यादरम्यान पुष्पेंद्र साधूने त्याची ओळख प्रेमसिंग नावाच्या दुसऱ्या साधूसोबत करून दिली होती. प्रेमसिंगने वकिलाला मंत्राने आपण पैसे डबल करून देतो, असे सांगितले. यासाठी त्याने पाचशे रुपयांचे पसरलेले बंडल, हवेत उडणाऱ्या पाण्याच्या बाटल्या, असे व्हिडीओ पाठवले. मंत्रतंत्राने आपण जमिनीतले सोनेही काढून देतो, अशी भुरळ त्याने वकिलाला घातली. साधूच्या बोलण्यावर वकिलाने डोळे झाकून विश्वास ठेवला आणि त्याच्याकडील रोकड दुप्पट करून घेण्यासाठी घरी बोलावले.
प्रेमसिंगने त्याच्या सीबीडी येथील घराची पाहणी करून घरात दोष असल्याने इथे काम होणार नाही, असे सांगून वकील व मांत्रिक यांनी परिचयाचा अनंत नरहरी याच्या घरी मंत्रतंत्र करण्याचा बेत ठरविला. त्यावरून १९ जुलैला नरहरीच्या घरात मंत्रतंत्रांची पूजा मांडली. वकिलाने पैसे डबल करून घेण्यासाठी २० लाख रुपये आणले. परंतु, मांत्रिक प्रेमसिंगला संशय आल्याने त्याने नोटांवर लाल डाग आल्याचे सांगून आज काम होणार नाही, असे सांगितले. त्यानंतर २२ जुलैला स्वतःहून त्याने वकिलाला फोन करून रोकड घेऊन पुन्हा त्याच ठिकाणी बोलवले. यावेळी घरात भलीमोठी पूजा मांडून, धूर करून वकील त्याची पत्नी व मुलाला बेडरूममध्ये मंत्र बोलायला लावून हॉलमधील रोकड १५ मिनिटांत डबल होईल, असे सांगितले. परंतु, दीड तास होऊनही मांत्रिकाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने वकिलाने हॉलमध्ये येऊन पाहिले असता रोकडीसह मांत्रिकही पळल्याचे उघड झाले.
पत्नीसह सासूला निर्वस्त्र हाेऊन करायला लावली पूजा
काही दिवसांपूर्वीच वाशीत राहणाऱ्या एका महिलेला व तिच्या आईला त्या महिलेच्या पतीनेच निर्वस्त्र होऊन अघोरी पूजा करायला लावले होते. मेहुण्याच्या लग्नासाठी त्यांना ही अघोरी पूजा करायला लावून त्यांचे फोटो, व्हिडीओ काढले गेले. सूडभावनेतून ते व्हायरल केल्याचा प्रकार घडला होता; तर पत्नीने तिच्या विवाहबाह्य संबंधातून पतीला मार्गातून हटवण्यासाठी मांत्रिकाला सुपारी दिल्याचा प्रकार रबाळेत घडला होता.
वास्तुशांतीच्या नावाखाली मांडलेल्या पूजेत हाडांचा वापर झाल्याचा प्रकार सुनेच्या तक्रारीनंतर उघडकीस आला होता. नेरूळमधील कुटुंबात सुनेवरील अत्याचार वाढू लागल्याने तिने थेट सासूचे हे मंत्रतंत्राचे कट कारस्थान उघड केल्याने तिच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
स्मार्ट सिटी नवी मुंबईतही मंत्रतंत्र
नवी मुंबईसारख्या स्मार्ट सिटीत उच्चशिक्षित घटकांचे प्रमाण अधिक आहे. त्यांच्यात श्रीमंतीसाठी किंवा इतर कारणांनी मंत्र-तंत्रांचा होणारा वापर सातत्याने समोर येत आहे. अशा प्रकरणी अनेक गुन्हेही दाखल होतात. त्यानंतरही नागरिकांमध्ये कृती, कर्म यांपेक्षा मंत्र-तंत्र, करणी यांवर अधिक विश्वास असल्याचे अशा प्रकरणांमधून समोर येत आहे.
दोनदा मिळाली बचावाची संधी
मांत्रिकाच्या जाळ्यातून वाचण्याची वकिलाला दोनदा संधी मिळाली होती. पुष्पेंद्र साधूने फोन करून तो फसवेल, असा इशारा दिला होता. दोन्ही संधी वकिलाला ओळखता आल्या नाहीत व तिसऱ्या दिवशी पुन्हा पूजेचा घाट मांडून भोंदू प्रेमसिंगने २० लाखांची रोकड पळवली.