मेडिकल दुकानाला आग प्रकरणात धक्कादायक खुलासा; कंपाऊंडरसह मृत डॉक्टरवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 13:55 IST2020-06-09T13:46:39+5:302020-06-09T13:55:00+5:30
मेडिकल दुकानाच्या आगीत डॉक्टरचा होरपळून मृत्यू झाला असून कंपाऊंडर गंभीर जखमी आहे

मेडिकल दुकानाला आग प्रकरणात धक्कादायक खुलासा; कंपाऊंडरसह मृत डॉक्टरवर गुन्हा दाखल
गेवराई : तालुक्यातील बागपिंपळगावजवळील तलवाडा फाटा येथे रविवारी मध्यरात्री मेडीकल दुकानाच्या आगीत डॉ. सुधाकर चोरमले यांचा मृत्यू तर कंपाऊंडर सुनील माळी गंभीर जखमी झाले होते. पोलीस तपासात आगीचे कारण पुढे आल्याने आता या प्रकरणाने वेगळे वळण घेतले असून मृत डॉ. चोरमलेसह कंपाऊंडर माळीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तलवाडा फाटा येथे डॉ. सुधाकर भाऊसाहेब चोरमले यांचे रुग्णालय आहे. त्याच शेजारी बेलगाव येथील व्यक्तीचे मेडीकल दुकान आहे. रविवारी मध्यरात्री या मेडीकल दुकानाला आग लागली यात डॉ. चोरमले यांचा होरपळून मृत्यू झाला. तर कंपाऊंडर माळी गंभीर जखमी असून त्याच्यावर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास करत कंपाऊंडर माळीची कसून चौकशी केली. यातून धक्कादायक माहिती पुढे आली.
मेडिकल शॉपमधील आगीत होरपळून डॉक्टरांचा मृत्यू; कंपाउंडर गंभीर जखमी
यावेळी डॉ. चोरमले आणि मेडीकल चालकाचे औषध विक्रीच्या कमीशनवरून नेहमी वाद होत असत. या वादातून डॉ. चोरमले यांनी मेडिकल चालकाला अद्दल घडविण्यासाठी दुकानाची बनावट चावी तयार करून घेतली. माळी याला रविवारी रात्री दुकानावर बोलवत बनावट चावीने दुकान उघडून आतील सामान जाळण्याचा प्रयंत्न केला. मात्र सामानासोबतच दुकानातील सेनीटायझरच्या बाटल्याने पेट घेतला, यातून फ्रीजचा स्फोट झाला. यात डॉ. चोरमले उडून दूर फेकले गेले तर माळी गंभीर जखमी झाला. यानंतर उपचारासाठी नेत असतांना डॉ. चोरमलेचा मृत्यू झाला, अशी माहिती पुढे आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी युवराज टाकसाळ यांच्या फिर्यादीवरुन पोलीसांना मृत डॉ. सुधाकर भाऊसाहेब चोरमले व कंपाऊंडर सुनील माळी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि राजाराम तडवी हे करत आहेत.