धक्कादायक ! जुगारासाठी धर्मादाय आयुक्तांच्या नावाने उकळले पैसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 21:36 IST2019-02-04T21:33:49+5:302019-02-04T21:36:22+5:30
पोलिसांनी किशोरला अटक करत चौकशी केली असता त्याने गुन्ह्यांची कबूली देत फसवणुकीतील पैसे पत्नीकडे दिल्याचं सांगितलं. किशोरने जुगार खेळण्यासाठी ही फसवणूक केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

धक्कादायक ! जुगारासाठी धर्मादाय आयुक्तांच्या नावाने उकळले पैसे
मुंबई - जुगारासाठी पैसे नसल्यामुळे एका भामट्याने चक्क एका सामाजिक संस्थेकडून (एनजीओ) धर्मादाय सहाय्यक आयुक्तांच्या नावाने फोन करून पैसे उकळल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी दादर पोलिसांनी किशोर आबाजी तांडेल (५२) याला अटक केली आहे. किशोरने जुगार खेळण्यासाठी पैसे नसल्याने हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. न्यायालयाने किशोरला पोलिस कोठडी सुनावली आहे. तक्रारदार पाठारे यांनी ज्या खात्यावर ही रक्कम पाठवली होती ते खाते ठाण्यातील एका नामांकीत बँकेचं असून ते खाते किशोर तांडेल यांच्या नावावर असल्याचं चौकशीत उघड झाले. पोलीस किशोरचा माग काढत सायन कोळीवाडा परिसरात पोहचले. त्यावेळी किशोर हा पत्नीसह पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी किशोरला अटक करत चौकशी केली असता त्याने गुन्ह्यांची कबूली देत फसवणुकीतील पैसे पत्नीकडे दिल्याचं सांगितलं. किशोरने जुगार खेळण्यासाठी ही फसवणूक केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
दादर परिसरात आगाशे रोडवर राहणारे तक्रारदार शेखर पाठारे यांची ‘नानाभाई फांऊडेशन’ नावाची एक सामाजिक संस्था आहे. २००४ पासून पाठारे हे या संस्थेवर विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. ही संस्था शिक्षणापासून वंचित आणि गरीब नागरिकांना आरोग्य उपचारासाठी आर्थिक मदत करते. २५ आॅक्टोबर २०१८ रोजी पाठारे यांच्या संस्थेतील कार्यालयात सहाय्यक धर्मादाय आयुक्त अभ्यंकर यांच्या नावाने फोन आला होता. त्यावेळी अभ्यंकर यांनी त्याच्या चालकाला किडनीवरील शस्त्रक्रियेनंतर औषध उपचारासाठी तातडीची २० हजार रुपयांची मदत हवी असल्याचं सांगितलं. त्यावेळी पाठारे यांनी मदत करण्याची तयारी दाखवत मदतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले. अभ्यंकर यांनी सोमवारी म्हणजेच २९ आॅक्टोबर रोजी वरळी येथील कार्यालयातून सर्व कागदपत्रे देण्याचे आश्वासन दिलं. तसंच तात्काळ मदत पाहिजे असून कार्यालयातील कामामुळे सोमवारपर्यंत भेटताही येणार नसल्याचं सांगितलं.