धक्कादायक ! घरात घुसून विनयभंग केल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 14:36 IST2018-08-23T14:35:59+5:302018-08-23T14:36:58+5:30
घरात एकटी असल्याचे पाहुन गावातीलच दोन मुलांनी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता.

धक्कादायक ! घरात घुसून विनयभंग केल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या
कन्नड (औरंगाबाद ) : घरात एकटी असल्याचे पाहुन गावातीलच दोन मुलांनी विनयभंग करून त्रास दिल्याने अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील तांदुळवाडी येथे बुधवारी (दि. २२) घडली. या प्रकरणी मयत मुलीच्या पित्याने आज दिलेल्या तक्रारीवरून दोन आरोपींविरूध्द ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी (दि.२१) प्रियंका बजरंग मोरे (१७) ही आई-वडील शेतात गेल्याने घरात एकटीच होती. यावेळी गावातीलच हेमंत साहेबराव सावंत व ज्ञानेश्वर गोटीराम गोडसे हे प्रियंकाच्या घरात घुसले. एकटी असल्याचा फायदा घेत त्यांनी तिचा विनयभंग केला. मात्र, प्रियंकाने हिंमत करत त्यांच्या हाताला झटका देऊन तेथून पळ काढत थेट शेत गाठले. शेतात जाताच तिने आई-वडिलांना घडलेली सर्व हकीकत सांगितली.
या घटनेमुळे प्रियंका अत्यंत तणावाखाली होती. यानंतर बुधवारी (दि.२२) सकाळी ६ वाजेच्या दरम्यान प्रियंकाने स्वयंपाक घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत बजरंग मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रोहीत बेंबरे करीत आहेत.