रेल्वेत चिमुकलीला 'एचआर मॅनेजर' करत होता चुकीचा स्पर्श; प्रवाशांनी व्हिडिओ काढताच आरोपी पळाला, देशभरात संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 15:35 IST2025-10-23T15:30:21+5:302025-10-23T15:35:57+5:30
भारतीय रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

रेल्वेत चिमुकलीला 'एचआर मॅनेजर' करत होता चुकीचा स्पर्श; प्रवाशांनी व्हिडिओ काढताच आरोपी पळाला, देशभरात संताप
Crime News:भारतीय रेल्वेतील महिला आणि मुलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. बिहारमधील एका ट्रेनमध्ये जनरल कोचमध्ये एका निष्पाप मुलीसोबत चुकीचे कृत्य करणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. प्रवाशांच्या सतर्कतेमुळे आरोपीला पकडण्यात आले असून, घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. शेजारी बसलेल्या या मुलीला हा नराधम चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असल्याचं एका व्यक्तीने पाहिले आणि त्याने याचा व्हिडीओ काढला. त्यानंतर त्याला जाब देखील विचारला.
व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, ही घटना बिहारमधील एका ट्रेनच्या जनरल कोचमध्ये घडली. सुमारे ७ ते १० वर्षांची एक मुलगी आपल्या आईच्या शेजारी बसलेली होती. यावेळी ५० वर्षांच्या आसपासचा एक व्यक्ती ट्रेन रिकामी असताना मुद्दामून मुलीच्या बाजूला येऊन बसला. सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटत असतानाच, त्या नराधमाने त्याच्याने हाताने कंबरेच्या भागाला स्पर्श करण्यास सुरुवात केली. त्याच्या या घृणास्पद कृत्यामुळे मुलगी घाबरून आपल्या आईला बिलगली, मात्र आरोपीने आपले चाळे सुरूच ठेवले.
व्हिडिओमुळे आरोपी पकडला
आरोपीच्या या लाजिरवाण्या कृत्याकडे जवळ उभ्या असलेल्या एका सतर्क प्रवाशाचे लक्ष गेले. त्याने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात हा संपूर्ण प्रकार रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. आपले कृत्य कॅमेरात कैद होत असल्याचे लक्षात येताच, आरोपी गोंधळला आणि तातडीने सीटवरून उठून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, इतर प्रवाशांनी त्याला पकडले आणि जाब विचारला. प्रवाशांसमोर तो स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होता.
या घटनेनंतर सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त होत आहे. लोकांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची ओळख शशी भूषण उपाध्याय अशी पटली आहे. तो गोपालगंज जिल्ह्यातील सिधवलिया गावात असलेल्या केके बिर्ला ग्रुपच्या 'मगध शुगर अँड एनर्जी' कंपनीत एचआर मॅनेजर या महत्त्वाच्या पदावर कार्यरत होता. साखर कंपनीने तात्काळ कारवाई करत आरोपी शशी भूषण उपाध्याय यांना नोकरीवरून काढून टाकले.
गोपालगंजचे एसपी अवधेश दीक्षित यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच तातडीने तपास सुरू करण्यात आला. आरोपीला ओळखण्यात आले असून, त्याला लवकरच अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एनसीआरबीच्या २०२४ च्या अहवालानुसार, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील २५ टक्के लैंगिक शोषणाची प्रकरणे ही रेल्वेमधील असून, यात १५ टक्के बालकांचा समावेश आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा भारतीय रेल्वेतील महिला आणि मुलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.