देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील सुरक्षा व्यवस्थेवर गोंधळ उडवणारी एक गंभीर घटना समोर आली आहे. ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेला इम्रान खान नामक कैदी न्यायालयाच्या आवारातून पलायन करून थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते अमित मटकर यांच्या कार्यालयात पोहोचला आणि त्यांना थेट धमकी दिली.
आर्थर रोड जेलमध्ये बंद असलेल्या इम्रान खानला १६ मे रोजी न्यायालयात हजेरीसाठी आणण्यात आले होते. सुनावणी झाल्यानंतर त्याला पुन्हा जेलमध्ये नेण्याची प्रक्रिया सुरू असताना, कोणत्याही पोलीस देखरेखीशिवाय तो न्यायालयाच्या आवारातून पलायन करण्यात यशस्वी झाला.
मनसे कार्यालयात घुसून दिली धमकीपळून गेल्यानंतर इम्रानने मास्क घालून मित्राच्या दुचाकीवरून भायखळा परिसरातील सात रास्ता येथील मनसे कार्यालयात पोहोचला. तेथे जाऊन त्याने मनसे नेते अमित मटकर यांना धमकी देत म्हटले की, “तुम्ही इथे का बसता? ही जागा तुमची नाही, तुम्ही इथे बसू नका, नाहीतर परिणामांना सामोरे जा.” हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, फुटेज पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
पोलिसांवर निष्काळजीपणाचे आरोप, दोन हवालदार निलंबितया घटनेने मुंबई पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. इतक्या संवेदनशील ठिकाणाहून एक कैदी सहजपणे पळून जाणे हे पोलिसांच्या सुरक्षा यंत्रणेतील त्रुटीचे लक्षण मानले जात आहे. या प्रकारानंतर कर्तव्यावर असलेले दोन हवालदार – अमोल सरकाळे आणि संदीप सूर्यवंशी – यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
पोलिसांचा तपास सुरूमनसे नेते अमित मटकर यांनी आग्रीपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यानंतर पोलिसांनी इम्रान खान आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
इम्रान खान फरारइम्रान खानला डिसेंबर २०२४ मध्ये ४० किलो गांजासह अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत होता. सध्या पोलिसांकडून इम्रान खानचा शोध युद्धपातळीवर सुरू असून, त्याच्या पलायनामागे कुणाचा हात आहे, याचा तपास सुरू आहे.