धक्कादायक! गळफास घेऊन अल्पवयीन मुलीने संपवलं जीवन, एकाला अटक
By परिमल डोहणे | Updated: December 25, 2023 20:19 IST2023-12-25T20:19:04+5:302023-12-25T20:19:40+5:30
प्रेम प्रकरणातून घटना घडल्याची सुरू आहे चर्चा

धक्कादायक! गळफास घेऊन अल्पवयीन मुलीने संपवलं जीवन, एकाला अटक
सावली: मागील काही दिवसांपासून तालुक्यातील खेडी येथे वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. पूनम राजकुमार शर्मा (१६) रा. बाबुपेठ चंद्रपूर असे मृत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी सावली पोलिसांनी प्रफुल्ल रामटेके याला अटक केली आहे. हे दोघेही प्रेम प्रकरणातून घर सोडून खेडीला वास्तव्यास होते, अशी चर्चा सुरु आहे.
चंद्रपूरातील बाबुपेठ पुनम शर्मा, प्रफुल्ल रामटेके हे मागील तीन महिन्यांपासून सावली तालुक्यातील खेडी येथे एक किरायाची रुम घेऊन वास्तव्यास होते. दरम्यान सोमवारी सकाळी प्रफुल्लने दरवाजा ठोठावला असता, तो आतून लावून असल्याचे दिसून आले. त्याने आवाज दिल्यानंतरही दरवाजा उघडला नाही. त्यामुळे काही जणांना मदतीला घेऊन दरवाजा तोडून बघितले असता पुनम ओळणीने गळफास घेतले असल्याचे समोर आले. खेडीतील पोलिस पाटील कृपाल दुधे यांनी याबाबतची माहिती सावली पोलिसांना दिली. ठाणेदार आशिष बोरकर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच प्रफुल्ल रामटेके याला ताब्यात घेऊन तपास सुरु केला आहे.