पारशिवनी( नागपूर) : मुलीचे एप्रिलमध्ये लग्न आहे. पैशाची जुळवाजुळव व्हायची आहे. या चिंतेत असलेल्या आणि सततच्या नापिकीमुळे त्रस्त शेतकऱ्याने शुक्रवारी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना पारशिवनी तालुक्यातील भुलेवाडी येथे शुक्रवारी ९ वाजताच्या सुमारास घडली. सहादेव माधोराव दिवटे (५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या शेतात जातो असे सांगून सहादेव घरून निघाले. त्यांनी सकाळी ९ वाजताच्या सुमारास शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांचा भाऊ सुरेश हा शेतात गेला असता त्याला सहादेव यांचा मृतदेह झाडाला टकलेला दिसून आला. यानंतर भुलेवाडी येथील पोलीस पाटील दिगांबर दिवटे यांनी घटनेची माहिती पारशिवनी पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणी करीता पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. सहादेव यांच्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यांना चार मुली आहेत. त्यातील पहिल्या मुलीचा विवाह ३० एप्रिलला होणार होता. त्याच्या नावे २ एकर शेती आहे. त्यात सततच्या नापिकीमुळे उत्पादन होत नव्हते. नापिकीमुळे ते त्रस्त होते. सोबतच मुलीचा विवाह कसा कराव, ही चिंता त्यांना भेडसावत होती. त्याच्या मृत्यूमूळे मुलीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे .