धक्कादायक! राष्ट्रीय बालिका दिनी आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 20:20 IST2023-01-25T20:19:48+5:302023-01-25T20:20:12+5:30
तिवसा तालुक्यातील घटना : वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी

धक्कादायक! राष्ट्रीय बालिका दिनी आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार
अमरावती: राष्ट्रीय बालिका दिनीच एका आठ वर्षीय चिमुकलीवर शारीरिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. २४ जानेवारी रोजी सकाळी ६.३० च्या सुमारास ही संतापजनक घटना घडली. याप्रकरणी तिवसा पोलिसांनी २५ जानेवारी रोजी याप्रकरणी बलात्कार, धमकी व पोक्सोअन्वये गुन्हा दाखल केला. आरोपीला तातडीने अटक करण्यात आली.
तिवसा तालुक्यातील एका गावातील आठ वर्षीय चिमुकली तिच्या लहान भावासह मंगळवारी सकाळी घराबाहेर खेळत असताना आरोपीने तिला घरी बोलावले. आरोपी परिचित असल्याने ते दोन्ही चिमुकले बहिण भाऊ त्याच्या घरी गेले. त्यावेळी त्या २४ वर्षीय आरोपीने त्या चिमुकलीवर अतिप्रसंग केला. घटनेची वाच्यता केल्यास तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. थोड्यावेळाने ती कन्हत घरी पोहोचल्याने तिच्या आईला संशय आला. छातीशी कुरवाळत आईने तिला विश्वासात घेतो असता तिने आपबिती कथन केली. अखेर मनाचा हिय्या करत महिलेने पोटच्या गोळ्याला सोबत घेऊन पोलीस ठाणे गाठले. मंगळवारी उशिरा रात्री १२.२३ मिनिटांनी आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.