धक्कादायक! आपल्या मुलीचे लाड कमी होतील; कन्यारत्न झाले म्हणून नणंदेने भावजयीला जिवंत जाळले 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 09:54 PM2021-07-18T21:54:31+5:302021-07-18T21:57:13+5:30

नणंदेविरुद्ध खुनाचा गुन्हा : पांढरकवडा तालुक्यातील दातपाडी येथील घटना. लग्न होऊनही नणंद कांता राठोड ही माहेरीच राहत होती. तिला एक मुलगी होती.

Shocking! brothers wife gave birth to a daughter, sister in law burnt her | धक्कादायक! आपल्या मुलीचे लाड कमी होतील; कन्यारत्न झाले म्हणून नणंदेने भावजयीला जिवंत जाळले 

धक्कादायक! आपल्या मुलीचे लाड कमी होतील; कन्यारत्न झाले म्हणून नणंदेने भावजयीला जिवंत जाळले 

Next

पांढरकवडा (यवतमाळ) : मुलगी झाली म्हणून एका महिलेला अंगावर ऑइल टाकून जिवंत पेटवून देण्यात आले. यात उपचारादरम्यान तिचा सेवाग्राम येथे मृत्यू झाला. ही घटना पांढरकवडा तालुक्यातील दातपाडी येथे घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी तिच्या पार्थिवावर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

या प्रकरणी मृत महिलेच्या नणंदेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोनिका गणेश पवार (२४) असे मृत महिलेचे नाव असून या प्रकरणात तिची नणंद कांता संजय राठोड (३५) हिच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मोनिकाचा विवाह सहा वर्षांपूर्वी दातपाडी येथील गणेश पवार याच्यासोबत झाला होता. तिला पाच वर्षांचा प्रवेश नामक मोठा मुलगा आहे. गणेश पवार याचे संयुक्त कुटुंब आहे. या कुटुंबात गणेशची बहीण कांता संजय राठोड ही विवाहित असून तिची सोडचिठ्ठी झाल्याने ती आपल्या माहेरीच राहते. गणेशची पत्नी मोनिका व बहीण कांता राठोड या दोघींमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने वाद व्हायचे. ही बाब मोनिकाने माहेरीदेखील सांगितली होती; परंतु मोनिकाचा पती, सासू-सासरे, भासरे, जाऊ हे सुस्वभावी असल्याने मोनिकाच्या माहेरच्यांनी कांताच्या विरोधात कधीच तक्रार केली नाही. 

४ जुलैला मोनिकाला मुलगी झाली. मात्र, ही बाब तिची नणंद कांता राठोड हिला खटकली. मुलीला जन्म का दिला, या कारणावरून ८ जुलैला मोनिका व कांता या दोघीत कडाक्याचे भांडण झाले. या भांडणानंतर दुपारी २ वाजेच्या सुमारास कांता संजय राठोड हिने बाथरूममधून बाहेर पडत असलेल्या मोनिकाच्या अंगावर पाठीमागून ऑइल टाकून तिला पेटवून दिले. यात मोनिका गंभीर जखमी झाली. तिला तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रविवारी १८ जुलैला सकाळी मोनिकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिची काकू आशा सुनील राठोड हिने पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पांढरकवडा पोलिसांनी कांता संजय राठोड हिच्याविरुद्ध भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली.

मुलीचे लाड कमी होतील याची आरोपीला भीती 
 लग्न होऊनही नणंद कांता राठोड ही माहेरीच राहत होती. तिला एक मुलगी होती. आपल्या लहान जावेला मुलगी झाल्याने आपल्या मुलीचे कुटुंबात लाड कमी होतील, तिच्याकडे दुर्लक्ष केले जाईल, अशी भावना निर्माण झाल्याने कांता राठोड हिने टोकाचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत नमूद आहे. याच भीतीतून कांताने मोनिकाला जिवंत जाळल्याचा आरोप आहे.

Web Title: Shocking! brothers wife gave birth to a daughter, sister in law burnt her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.