Shocking! 39 Death bodies found in truck container, driver arrested | धक्कादायक! कंटेनरमध्ये सापडले 39 मृतदेह, ड्रायव्हर अटकेत

धक्कादायक! कंटेनरमध्ये सापडले 39 मृतदेह, ड्रायव्हर अटकेत

लंडन - कंटेनरमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 39 मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना इंग्लंडमधील एसेक्स येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी एसेक्स पोलिसांनी उत्तर आयर्लंडमधील रहिवासी असलेला ट्रेलरचालक आणि त्याच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीनाला अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. 

 एसेक्स प्रांतातील ग्रेस शहराच्या ईस्टर्न एव्हेन्यू येथील वॉटरग्लेड इंडस्ट्रियल पार्कजवळ या संशयित ट्रेलरमधील कंटेनरबाबत अॅम्बुलन्स सर्व्हिसकडून पोलिसांना सूचना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तसेच नॉर्दन आयर्लंडमधील ड्रायव्हर असलेल्या तरुणाला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे.  

एसेक्स पोलिसांनी सांगितले की, हे वाहन बुल्गारियामधून निघून शनिवारी एंगलेसे येथून होलिहेडमार्गे इंग्लंडमध्ये पोहोचले होते. प्राथमिक अंदाजानुसार या कंटेनरमध्ये असलेल्या सर्व 38 प्रौढ आणि एका किशोरवयीन व्यक्तीचा मृत्यू झाला. या कंटेनरमध्ये असलेल्यांपैकी एकही व्यक्ती बचावली नाही. 

 दरम्यान, इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. मी या घटनेबाबत सातत्याने माहिती घेत आहे. तसेच गृहविभाग एसेक्स पोलिसांसोबत मिळून तपासावर लक्ष ठेवून आहे. या घटनेमागचं नेमकं काय कारण आहे, याचा शोध घेतला जात आहे.'' असे जॉन्सन यांनी सांगितले.  

Web Title: Shocking! 39 Death bodies found in truck container, driver arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.