शेल्टर होममधील मुलींवर अत्याचार : ब्रजेश ठाकूरसह १९ जण दोषी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 05:45 IST2020-01-21T05:45:36+5:302020-01-21T05:45:46+5:30
मुजफ्फरपूर (बिहार) येथील निवारागृहातील (शेल्टरहोम)अनेक मुलींच्या लैंगिक छळाच्या खटल्यात दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी ब्रजेश ठाकूर आणि इतर १८ जणांना दोषी ठरवले.

शेल्टर होममधील मुलींवर अत्याचार : ब्रजेश ठाकूरसह १९ जण दोषी
नवी दिल्ली : मुजफ्फरपूर (बिहार) येथील निवारागृहातील (शेल्टरहोम)अनेक मुलींच्या लैंगिक छळाच्या खटल्यात दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी ब्रजेश ठाकूर आणि इतर १८ जणांना दोषी ठरवले.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश सौरभ कुलश्रेष्ठ यांनी ब्रजेश ठाकूर याला पोक्सो कायदा आणि सामूहिक बलात्कार कायद्याखाली दोषी ठरवले. बिहार पीपल्स पार्टीचा माजी आमदार ब्रजेश ठाकूर हा हे शेल्टरहोम चालवायचा. न्यायालयाने एका आरोपीला निर्दोष मुक्त केले. दोषी ठरलेल्या आरोपींत १२ पुरुष व आठ महिला आहेत. दोषींना कोणती शिक्षा होणार यावरील युक्तिवाद २८ जानेवारी रोजी होईल.
या खटल्यात केंद्रीय अन्वेषण खात्याचा (सीबीआय) वकील आणि २० आरोपींकडून अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने ३० सप्टेंबर २०१९ रोजी आपला आदेश राखून ठेवला होता. या खटल्यात बिहारच्या माजी समाजकल्याणमंत्री आणि जनता दलाच्या (संयुक्त) तत्कालीन नेत्या मंजू वर्मा यांनाही मोठ्या टीकेला तोंड द्यावे लागले होते, कारण मंजू वर्मा यांच्या पतीशी ब्रजेश ठाकूर यांचे संबंध असल्याचे आरोप झाले होते. मंजू वर्मा यांना ८ आॅगस्ट २०१८ रोजी मंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला.
काय होते आरोप?
न्यायालयाने ब्रजेश ठाकूरसह आरोपींवर ३० नोव्हेंबर, २०१९ रोजी अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचारासाठी गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप निश्चित केला. या आरोपींवर शेल्टर होममधील अल्पवयीन मुलींना अमली पदार्थ खाऊ घालणे, त्यांना गुन्हेगारी स्वरूपाच्या धमक्या देणे, त्यांचा लैंगिक छळ करणे या आरोपांसाठीही खटला चालला. ठाकूर आणि त्याच्या शेल्टर होमचे कर्मचारी, तसेच बिहारच्या समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांवरही गुन्हेगारी कट रचणे, कर्तव्याकडे दुर्लक्ष करणे आणि मुलींवर झालेल्या अत्याचाराची माहिती न देणे असे आरोप होते.