पतीवर उकळतं तेल फेकलं; तडफडताना पाहून मिरची पावडर जखमांवर ओतली! पत्नी इतकी क्रूर का झाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 14:29 IST2025-10-08T14:29:08+5:302025-10-08T14:29:37+5:30
पत्नीने झोपलेल्या पतीवर उकळते तेल ओतले आणि त्यानंतर त्याच्या भाजलेल्या जखमांवर लाल मिरची पावडर ओतली.

पतीवर उकळतं तेल फेकलं; तडफडताना पाहून मिरची पावडर जखमांवर ओतली! पत्नी इतकी क्रूर का झाली?
दक्षिण दिल्लीतील आंबेडकर नगर परिसरात क्रूरतेची परिसीमा गाठणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका पत्नीने झोपलेल्या पतीवर उकळते तेल ओतले आणि त्यानंतर त्याच्या भाजलेल्या जखमांवर लाल मिरची पावडर ओतली. पीडित पतीची प्रकृती अत्यंत गंभीर असून, तो सध्या सफदरजंग रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे.
पीडित युवक दिनेश कुमार (२८) हा दक्षिण दिल्लीतील मदनगीर भागात पत्नी साधना आणि एका लहान मुलीसह भाड्याच्या घरात राहत होता. तो एका फार्मा कंपनीत नोकरी करतो.
नेमकी घटना काय घडली?
पोलिसांना दिलेल्या जबाबात दिनेशने सांगितले की, २ ऑक्टोबरच्या रात्री ड्युटीवरून परतल्यानंतर त्याने नेहमीप्रमाणे जेवण केले आणि तो झोपी गेला. त्याची पत्नी आणि मुलगीही त्याच्या बाजूला झोपल्या होत्या. पहाटे सुमारे ३:१५ वाजता त्याची पत्नी साधना हिने अचानक त्याच्या अंगावर उकळते तेल टाकले. आपल्यासोबत नेमकं काय घडलं? हे समजण्यापूर्वीच साधनाने त्याच्या अंगावर लाल मिरची पावडर ओतायला सुरुवात केली.
या अमानुष कृत्यामुळे वेदनेने तळमळणाऱ्या दिनेशच्या किंकाळ्या ऐकून घरमालक जागे झाले. त्यांनी तात्काळ दिनेशचे मेहुणे रामसागर यांना फोन करून घटनेची माहिती दिली. रामसागर यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दिनेशला मदन मोहन मालवीय रुग्णालयात नेले. मात्र, प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी त्याला तातडीने सफदरजंग रुग्णालयात हलवले.
आठ वर्षांचे वैवाहिक आयुष्य, वादाचे कारण काय?
याप्रकरणी पोलिसांनी ३ ऑक्टोबर रोजी दिनेशच्या जबाबावरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितले की, हे प्रकरण गंभीर घरगुती हिंसाचाराचे दिसत असून, प्रत्येक बाजूने तपास केला जात आहे.
दिनेशने पोलिसांना सांगितले की, त्याचे आणि साधनाचे लग्न आठ वर्षांपूर्वी झाले होते. दोन वर्षांपूर्वीही तिने दिनेशविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती, मात्र तेव्हा त्यांच्यात समेट झाला होता. साधना हिने सीएडब्ल्यू सेलमध्ये तक्रार दिलेली आहे. पोलीस आता या जुनाट वादांच्या पार्श्वभूमीवर प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.
कुटुंब आणि शेजारीही हादरले!
या धक्कादायक घटनेमुळे दिनेशचे कुटुंबीय मोठ्या धक्क्यात आहेत, तर शेजारीही या क्रूरतेमुळे स्तब्ध झाले आहेत. सध्या पोलीस आरोपी पत्नी साधना हिची कसून चौकशी करत असून, या भयानक कृत्यामागे वैयक्तिक वाद, मानसिक तणाव किंवा इतर काही कारण आहे का, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, दिनेशची प्रकृती अजूनही गंभीर आहे.