'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 15:07 IST2025-08-08T15:06:51+5:302025-08-08T15:07:12+5:30
जेव्हा शाहनवाज पत्नीला घेऊन घरातून बाहेर पडला तेव्हा पत्नीने प्रियकराला कॉल करून लोकेशन कळवले

'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
सोनीपत - गनौर येथील २८ वर्षीय फर्निचर कारागीर शाहनवाज हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. या हत्येमागे शाहनवाजची पत्नी मैफरिन आणि तिचा प्रियकर तसव्वूरचा हात असल्याचं उघड झाले. या दोघांनी कोडवर्डच्या माध्यमातून हे संपूर्ण षडयंत्र रचले. त्यानंतर निर्जनस्थळी शाहनवाजचा कायमचा काटा काढला.
माहितीनुसार, शाहनवाज त्याच्या पत्नीसोबत उत्तर प्रदेशातील कैरानाहून १.२५ लाख रुपये घेऊन शामलीच्या खुरगान गावात चालला होता. रस्त्यात काही टोळक्यांनी त्याला अडवले आणि त्याच्याकडून रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला. शाहनवाजने जेव्हा याचा विरोध केला तेव्हा हल्लेखोरांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर दुचाकीवर बसून हे हल्लेखोर तिथून पसार झाले. पोलिसांनी शाहनवाजच्या हत्येचा तपास सुरू केला तेव्हा या हत्येत पत्नी मैफरिनचा सहभाग असल्याचे पुढे आले. प्रियकर तसव्वूरसोबत प्लॅनिंग करून पत्नीने पतीची हत्या घडवून आणली. त्यासाठी एक कोड वर्डही तयार केला होता.
जेव्हा शाहनवाज पत्नीला घेऊन घरातून बाहेर पडला तेव्हा पत्नीने प्रियकराला कॉल करून लोकेशन कळवले. लोकेशन देण्याआधी दोघांमध्ये एक कोड वर्ड तयार केला होता. आरोपींची चौकशी केली तेव्हा दोघांनी पतीच्या हत्येसाठी कोडवर्ड बनवल्याचं समोर आले. 'मंजिल आने वाली है, पुल पार करो' बस थोडा इंतजार करो असा कोड वर्ड तयार करण्यात आला होता. मंजिल आने वाली है याचा अर्थ खुरगान रोड येत आहे कारण याच रोडवर हत्या करण्याचं रचले होते. बस थोडा इंतजार करो म्हणजे बाइक खुरगान रोडला पोहचणार आहे, पुल पार करो म्हणजे आमच्या बाईकच्या मागे मागे राहा. या कोड वर्डच्या माध्यमातून आरोपी शाहनवाजचा पाठलाग करत होते.
का केली हत्या?
३ दिवसांपूर्वी शाहनवाजने पत्नीला प्रियकराशी बोलताना पकडले होते. त्यानंतर त्याने पत्नीला मारहाण केली. मैफरिनने ही घटना प्रियकराला सांगितली. त्यावेळी प्रियकराने साथीदारांसोबत मिळून शाहनवाजच्या हत्येचा कट रचला. तू फक्त लोकेशन देत राहा असं त्याने मैफरिनला सांगितले होते. हॉस्पिटलमध्ये मैफरिन वारंवार रडत होती, बेशुद्ध होण्याचं नाटक करत होती त्यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी तिला जबाब नोंदवण्यास सांगितले परंतु ती रडण्याचा ड्रामा करत राहिली. त्यानंतर आरोपी तसव्वूर आणि आरोपी महिला मैफरिन यांचे कॉल डिटेल्स तपासले तेव्हा हे दोघे मागील ६ महिन्यापासून फोनवर सातत्याने बोलत असल्याचे समोर आले. पोलिसांनी खाकीचा धाक दाखवताच दोघांनी आपला गुन्हा कबूल केला.