ठाणे : स्वत:च्याच अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका ५६ वर्षीय चुलत्याला ठाणे न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावासाची तसेच २२ हजार रुपये दंडाची शिक्षा बुधवारी सुनावली. पुतणीला दहाव्या मजल्यावरून फेकून देऊन ठार मारण्याची धमकी देत या चुलत्याने सहा वर्षांपूर्वी अत्याचार केले होते.हा प्रकार एप्रिल २०१४ ते ७ मे २०१४ या काळात घडला होता. आरोपीने पीडित मुलीचे नववीचे शिक्षण सुरू असताना मुंब्रा येथील हॉटेलमध्ये तिच्यावर अत्याचार केले. आपल्याच चुलत्याकडून झालेल्या या अत्याचारांबद्दल पीडितेने तिच्या आईला ही माहिती दिली. तिच्या तक्रारीनंतर या चुलत्याविरुद्ध ६ जून २०१४ रोजी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी आरोपीला लगेच अटक केली होती. तपासाअंती ठाणे न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. बुधवारी ठाण्याचे न्यायाधीश एस. पी. गोंधळेकर यांनी सर्व बाजू पडताळून आरोपीला दोषी ठरवून १० वर्षांच्या कारावासाची आणि २२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
पुतणीवरच लैंगिक अत्याचार; काकाला दहा वर्षे कारावास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 05:59 IST