नागपुरातील अजनीत थरार : पत्नी व तिच्या प्रियकराची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 00:00 IST2020-07-27T23:58:24+5:302020-07-28T00:00:58+5:30
पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे संतापलेल्या पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराची कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण हत्या केली. रविवारी मध्यरात्री अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही थरारक घटना घडली.

नागपुरातील अजनीत थरार : पत्नी व तिच्या प्रियकराची हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे संतापलेल्या पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराची कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण हत्या केली. रविवारी मध्यरात्री अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही थरारक घटना घडली. किरण कुवरलाल बरमय्या आणि शिवा बालाघाटी अशी मृतांची नावे आहेत, तर कुवरलाल बरमय्या (वय ४०) असे आरोपीचे नाव आहे.
मानेवाडा बेसा मार्गावरील कल्याणेश्वर नगर जवळच्या बाळकृष्ण नगरात भाड्याच्या खोलीत कुवरलाल आणि त्याची पत्नी राहत होते. तो बांधकामस्थळी मिस्त्रीचे काम करत होता, पत्नी किरणही त्याच्यासोबत कामाला जायची. शिवादेखील मजुरीचे काम करत होता. शिवा नातेवाईक असल्याचे किरणने कुवरलालला सांगितले होते. तो अधूनमधून कुवरलालच्या घरी यायचा. अलीकडे त्याचे घरी येणे वाढले होते. काही दिवसांपूर्वी अचानक घरी परतलेल्या कुवरलालला शिवा आणि किरण संशयास्पद स्थितीत दिसले. त्यामुळे या दोघांच्या संबंधावर कुवरलाल संशय घेऊ लागला. त्यांच्यात अनैतिक संबंध असल्याची कुवरलालला शंका होती.
पोलिसांच्या माहितीनुसार, शिवा दोन दिवसापासून कुवरलालच्या घरी थांबला होता. रविवारी रात्री शिवा, कुवरलाल आणि किरण दारू पिऊन जेवले. त्यानंतर हे तिघे झोपी गेले. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास शिवा आणि किरण खोलीतून बाहेर पडले. झोपेचे सोंग घेऊन पडलेला कुवरलाल त्यांच्यावर नजर ठेवून होता. काही वेळानंतर तो बाहेर आला. तेव्हा शिवा आणि किरण हे दोघे त्याला अंधारात जवळजवळ दिसले. आधीच चिडून असलेल्या कुवरलालने शिवा आणि किरणवर कुºहाडीचे घाव घालून त्यांना रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. किंकाळी ऐकून शेजाऱ्यांनी खिडकीतून बघितले तेव्हा त्यांना हा थरारक प्रकार दिसला. त्यांनी अजनी पोलिसांना कळविले. ठाणेदार प्रदीप रायान्नावार सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले.
त्यावेळी कुवरलाल तेथेच बसून होता. पोलिसांनी दोघांचे मृतदेह मेडिकलमध्ये पाठविले आणि कुवरलालला ताब्यात घेतले. त्याने घटनास्थळीच पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली.
दोघांचेही दुसरे लग्न
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत उघड झालेल्या माहितीनुसार, कुवरलाल, किरण आणि शिवा हे तिघेही बालाघाटमधील रहिवासी आहेत. कुवरलालला पत्नी आणि मुले आहेत. मात्र, त्यांना सोडून तो नागपुरात आला. किरणलाही पती आणि मुले आहेत. मात्र तिनेही नागपुरात येऊन कुवरलालसोबत गेल्या काही वर्षांपासून संसार थाटला होता.