वाई हत्याकांडात खळबळजनक कबुली; संतोष पोळ म्हणतोय, मी नव्हे ज्योतीने खून केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 22:37 IST2021-11-17T22:37:15+5:302021-11-17T22:37:36+5:30
महाराष्ट्रासह देशात खळबळ उडवून देणारे धोम (वाई) हत्याकांड २०१६ मध्ये घडले.

वाई हत्याकांडात खळबळजनक कबुली; संतोष पोळ म्हणतोय, मी नव्हे ज्योतीने खून केला
सातारा : सहा खुनांचे आरोप असलेला कथित डॉक्टर संतोष पोळ याने उलटतपासणीत बुधवारी धक्कादायक कबुली दिली असून, अंगणवाडी सेविका मंगल जेधे यांचा खून आपण केला नसून तो ज्योती मांढरे हिने केला व पोलिसांनी आपणाला गुंतविण्यासाठी तो मृतदेह पोल्ट्रीमध्ये पुरल्याचे सांगितले.
महाराष्ट्रासह देशात खळबळ उडवून देणारे धोम (वाई) हत्याकांड २०१६ मध्ये घडले. एकापाठोपाठ सहा खून उघडकीस आले होते. या खटल्यात संतोष पोळची एकेकाळची सहकारी असलेली ज्योती मांढरे ही या खटल्यात माफीची साक्षीदार बनलीय.
दरम्यान, जिल्हा न्यायालयात बुधवारी दुपारी कथित डॉक्टर संतोष पोळ, ज्योती मांढरे यांना सुनावणीसाठी आणण्यात आले. सध्या संतोष पोळचा उलट तपास सुरू आहे. या उलट तपासामध्ये पोळ म्हणाला, मंगल जेधे यांचा खून ज्योती मांढरे हिनेच केला आहे. पोलीस आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्यातूनच पोलिसांच्या मदतीने जेधे यांचा मृतदेह आणून त्याच्या पोल्ट्रीफार्ममध्ये पुरल्याचा आरोप त्याने केला. न्यायाधीशांनी सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर या खटल्याची पुढील सुनावणी ६ डिसेंबर रोजी होणार असल्याचे सांगितले.