शाळकरी मुलीमुळे झाला प्रिन्सी हत्याकांडाचा उलगडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 23:26 IST2019-12-13T23:25:34+5:302019-12-13T23:26:04+5:30
अरविंदने त्याची मुलगी प्रिन्सीची दोन दिवसांपूर्वीच बाजारातून चाकू आणून हत्या केली होती.

शाळकरी मुलीमुळे झाला प्रिन्सी हत्याकांडाचा उलगडा
कल्याण : परधर्मीय युवकाशी असलेल्या प्रेमसंबंधांमुळे मुलीची हत्या करणाऱ्या नराधम पिता अरविंद तिवारी याच्या अटकेसाठीपोलिसांना मदत करणाºया दोन रिक्षाचालकांचा पोलिसांनी शुक्रवारी गौरव केला. या रिक्षाचालकांसह एका शाळकरी मुलीचीही तपासात मोलाची मदत झाली. या मुलीनेच आरोपीच्या घरचा पत्ता सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. फक्त नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलीस आरोपीपर्यंत पोहोचू शकले. त्यांच्यामुळेच या हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले.
८ डिसेंबर रोजी पहाटे आरोपी अरविंद तिवारी हा कल्याण रेल्वे स्थानकात आला, तेव्हा त्याच्या हातात तपकीरी रंगाची मोठी बॅग होती. त्याने कोनगावाकडे जाण्यासाठी रिक्षा चालकाकडे विचारणा केली असता, त्याच्या हातातील बॅगेतून दुर्गंधी येत असल्याने बॅगेत काय आहे, वास कशाचा येतो, अशी विचारणा रिक्षा चालक सलीम खान यांनी केली. दुसरा रिक्षा चालक मोहम्मद मोमीननेही हटकले असता, त्याने बॅग टाकून पळ काढला. त्यानंतर खान आणि मोमीन या दोघांनी तातडीने पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले. पोलिसांनी बॅग तपासली असता, त्यात मुलीचे कंबरेखालील शरीर होते.
अरविंदने त्याची मुलगी प्रिन्सीची दोन दिवसांपूर्वीच बाजारातून चाकू आणून हत्या केली होती. तिच्या शरिराचे तीन तुकडे करुन, शरीराचा कंबरेवरचा भाग आणि डोके कल्याणच्या खाडी फेकून दिले. पोलिसांनी २४ तासाच्या आत अरविंदला अटक केली. प्रिन्सिचे धड कल्याणच्या खाडीतून पोलिसांना मिळाले आहे. मात्र तिचे डोके अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही. अरविंद या मुलीसोबत टिटवाळा येथे राहतो. त्याच्या तीन मुली व पत्नी जौनपूर येथे राहतात.
सतर्कतेमुळे डाव फसला
प्रिन्सचे एका मुस्लिम तरुणाशी प्रेमसंबंध जुळले होते. त्यास अरविंदचा विरोध होता. प्रिन्सी ऐकत नसल्याने अरविंदने तिची हत्या केली. तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा त्याचा प्रयत्न सतर्क रिक्षा चालकांमुळे फसला. तर एका चिमुकलीने त्याचा पत्ता पोलिसांना सांगितला.