चिमुकलीचं साहस! काच फोडून धावत्या कारमधून उडी, गुंडांना भिडली अन् किडनॅपिंगचा डाव हाणून पाडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 20:09 IST2023-03-17T20:08:27+5:302023-03-17T20:09:48+5:30
ओडिशाच्या केंद्रपाडा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी केंद्रपाडा जिल्ह्यातील पट्टामुंडईमध्ये १५ वर्षीय शालेय विद्यार्थिनीला तीन गुंडानी किडनॅप केलं.

चिमुकलीचं साहस! काच फोडून धावत्या कारमधून उडी, गुंडांना भिडली अन् किडनॅपिंगचा डाव हाणून पाडला
नवी दिल्ली-
ओडिशाच्या केंद्रपाडा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी केंद्रपाडा जिल्ह्यातील पट्टामुंडईमध्ये १५ वर्षीय शालेय विद्यार्थिनीला तीन गुंडानी किडनॅप केलं. यावेळी विद्यार्थिनीनं मोठ्या हिमतीनं स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी झटापट सुरू केली. पण तिला यश मिळू शकलं नाही. त्यानंतर तिनं स्वत:च्या जिवाची पर्वा न करता धावत्या कारमधून उडी मारली आणि अपहरणकर्त्यांचा डाव हाणून पाडला.
प्रकरण पोलिसांत गेल्यानंतर संपूर्ण तपासाला सुरुवात झाली. पोलिसांनी सांगितलं की ही घटना केंद्रपाडा जिल्ह्यातील पट्टामुंडई पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. एमएन हायस्कूलजवळ ही घटना घडली. विद्यार्थिनी सकाळी ११ वाजून २० मिनिटांच्या सुमारात दहावीची परीक्षा देऊन घरी परतत होती. यावेळी तीन अज्ञातांनी तिचं अपहरण केलं. गुंडांनी तिला आपल्या कारमध्ये ओढलं आणि ती विरोध करुन लागल्यानं चाकूनं वार केला. विद्यार्थिनीनं तरीही स्वत:चा बचाव करण्याचा भरपूर प्रयत्न केला. तर गुंडांनी कारच्या काचा बंद केल्या.
पोलिसांनी सांगितलं की गुंडांनी मारहाण केल्यामुळे विद्यार्थिनीच्या हात, पाय आणि मानेला दुखापत झाली आहे. विद्यार्थिनीनं दाखवलेल्या हिमतीला दाद दिली जात आहे कारण तिनं न डगमगता गुंडांचा सामना केला. कारची काच फोडून ती धावत्या कारमधून बाहेर पडली. त्यानंतर घाबरलेल्या गुंडांनी घटनास्थळावरुन पळ काढला.
पोलिसांच्या माहितीनुसार विद्यार्थिनी आता सुखरुप तिला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. याप्रकरणी तीन अज्ञातांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे आणि त्यांना पकडण्यासाठी तीन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.