उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील नीबी गहवार परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या परिसरात राहणाऱ्या एका महिलेला तिच्या पतीकडून, सासरच्यांकडून आणि पतीच्या दुसऱ्या पत्नीच्या हातून मारहाण आणि छळ सहन करावा लागल्याची घटना घडली आहे. पीडितेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, संबंधितांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
बेदौली भिंसा गावातील रहिवासी अनिता देवी हिचा विवाह २७ मे २०२२ रोजी सुनील कुमार याच्याशी झाला होता. लग्नानंतर एका वर्षात अनिताने एका मुलीला जन्म दिला. मात्र त्यानंतर तिच्यावर हुंड्यासाठी छळ वाढू लागल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. पती सुनील कुमार, सासरे राम नरेश आणि सासू सरिता देवी यांनी तिला वेळोवेळी त्रास दिला. एक महिन्यापूर्वी तिला मारहाण करून माहेरी पाठवण्यात आले होते.
या दरम्यान, अनिता तिच्या आई-वडिलांकडे राहत असतानाच, पतीने १७ मे २०२५ रोजी संगीता नावाच्या दुसऱ्या महिलेशी विवाह केला. १९ मे रोजी अनिता जेव्हा परत सासरी आली, तेव्हा तिच्यासमोर वास्तव उघड झाले. पतीच्या दुसऱ्या पत्नीला घरात पाहून ती संतप्त झाली. मात्र, तिने विरोध दर्शवताच तिच्यावर पती, सासू, सासरे आणि सह-पत्नीने शारीरिक आणि मानसिक अत्याचार केला. मारहाण केल्यानंतर तिला घराबाहेर हाकलून देण्यात आले आणि कायदेशीर कारवाई केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली गेली, असा आरोप तिने केला आहे. सामुदायिक पंचायत झाल्यानंतरही सासरच्या मंडळींनी कोणतीही सुधारणा केली नसल्याचे पीडितेने सांगितले.
कायदेशीर कारवाई सुरूअनिताने स्थानिक पोलीस ठाण्यातील इन्स्पेक्टर शैलेंद्र सिंह यांच्याकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिच्या तक्रारीनुसार पती, सासू, सासरे आणि पतीच्या दुसऱ्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.