सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात एसीबीने लाचखोर लिपिकास रंगेहाथ पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 18:55 IST2021-04-05T18:07:46+5:302021-04-05T18:55:46+5:30
Anti corruption bureau arrested clerk in sawantwadi : उत्पन्न दाखला देण्यासाठी "त्या" लिपिकाने स्वीकारली चार हजाराची लाच

सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात एसीबीने लाचखोर लिपिकास रंगेहाथ पकडले
सावंतवाडी : उत्पन्न दाखला देण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच घेताना येथील तहसीलदार कार्यालयातील लिपिकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. पुरुषोत्तम कृष्णा वारंग (५२) रा.तुळसुली-कुडाळ असे त्याचे नाव आहे. ही कारवाई आज दुपारी लाचलुचपत विभागाच्या पथकाकडून करण्यात आली. याबाबतची तक्रार एका महिलेने दिली होती.
संबंधित लिपिक उत्पन्न दाखला देण्यासाठी पैसे मागत असल्याची तक्रार एका महिलेने लाचलुचपत विभागाकडे केली होती.यात संबंधित लिपिक दाखला देण्यासाठी गेले अनेक महिने टाळाटाळ करत असून तात्काळ मिळण्यासाठी आपल्याकडे ४ हजार रुपयांची मागणी करत आहे, असे तिने दिलेल्या तक्रारीत म्हटले होते.त्यानुसार लाचलुचपत पथकाचे अधिकारी आज सावंतवाडीत दाखल झाले.यावेळी संबंधिताला लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई लाचलुचपतचे उपअधीक्षक दीपक कांबळे,पोलिस निरीक्षक सुनील कुंभार,हवालदार पोतनीस,कांचन प्रभू आदींनी केली.