नातं बनलं ओझं, सरपंच पतीने युवतीला संपवलं; ४० दिवसानंतर सांगाडा जमिनीतून बाहेर काढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 14:15 IST2025-03-31T14:15:37+5:302025-03-31T14:15:54+5:30
रिजवान दर महिन्याला युवतीला १० हजार रूपये द्यायचा परंतु ती ४० हजारांची मागणी करत होती. त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू होता.

नातं बनलं ओझं, सरपंच पतीने युवतीला संपवलं; ४० दिवसानंतर सांगाडा जमिनीतून बाहेर काढला
अनैतिक नातं ओझं बनल्यानंतर सरपंच पतीने त्याच्या साथीदारांसोबत मिळून एका डान्सर युवतीची हत्या केली आहे. गळा दाबून युवतीला संपवण्यात आले. त्यानंतर गव्हाच्या शेतात ८ फूट खड्डा खणून युवतीचा मृतदेह दफन करण्यात आला. हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी सरपंच पतीसह त्याच्या साथीदारांना बेड्या ठोकल्या. तब्बल ४० दिवसांनी महिलेचा सांगाडा जमिनीतून बाहेर काढण्यात आला. उत्तर प्रदेशातील बदायू इथं ही घटना घडली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा आणखी तपास करत आहेत.
मृतक युवती गालम पट्टी इथं राहणारी होती. १८ फेब्रुवारीपासून ती बेपत्ता होती. त्यानंतर कुटुंबाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. मात्र पोलिसांनी तिच्या शोधासाठी काही कार्यवाही केली नाही. त्यानंतर युवतीच्या मामाने एसएसपी यांना पत्र लिहून न्यायाची मागणी केली. त्यानंतर २८ फेब्रुवारीला अल्लापूर नापूर इथल्या सरपंच पतीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. युवतीच्या मामाला रिजवान यांच्यावर संशय होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली परंतु तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. जेव्हा पोलिसांनी खाकीचा धाक दाखवला तेव्हा त्याने हत्येची कबुली दिली.
यानंतर पोलिसांनी रिजवानसह त्याला मदत करणाऱ्या रामौतार आणि राधेश्याम याला अटक केली. आरोपींच्या चौकशीतून युवतीचा मृतदेह पुरल्याच्या ठिकाणी पोलिसांनी जेसीबीने खोदकाम केले. त्यात ८ फूट खड्ड्यात युवतीचा सांगाडा सापडला. पोलिसांनी मानवी सांगाडा ताब्यात घेत तो फॉरेन्सिक विभागाकडे तपासाला पाठवला आहे. रिजवान दर महिन्याला युवतीला १० हजार रूपये द्यायचा परंतु ती ४० हजारांची मागणी करत होती. त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू होता.
१८ फेब्रुवारीला रिजवान युवतीला घेऊन स्कूटीवरून जात होता तेव्हा रामौतार आणि राधेश्याम यांनी वाटेत अडवून युवतीचा तिच्या ओढणीने गळा दाबून खून केला. यासाठी रिजवाननं दोघांनी ७०-७० हजार रूपये दिले होते. त्यानंतर या तिघांनी मिळून शेजारीत गव्हाच्या शेतात ८ फूट खड्डा खणून तिचा मृतदेह गाडला. तो ४० दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी बाहेर काढला आहे.