बनावट कागदपत्राप्रकरणी संतोष आंबेकरला कोर्टात केले हजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 20:56 IST2020-02-24T20:54:43+5:302020-02-24T20:56:38+5:30
बनावट कागदपत्र सादर केल्याचे प्रकरण : अंतिम युक्तिवाद मार्चमध्ये

बनावट कागदपत्राप्रकरणी संतोष आंबेकरला कोर्टात केले हजर
अमरावती - संचित रजा वाढविण्याकरिता कुख्यात संतोष शशिकांत आंबेकर (रा. इतवारी हायस्कूल, लकडगंज, नागपूर) याने बनावट कागदपत्र सादर करून शासनाची फसवणूक केली होती. सोमवारी दुपारी या प्रकरणात मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात त्याला हजर करण्यात आले आहे.
सरकारी पक्षाने याआधी सादर केलेले पुराव्याबाबत कायद्यानुसार आरोपी संतोषला त्याचे म्हणणे मांडण्यासाठी हजर केले असता, न्यायालयाने त्याची बाजू ऐकून अंतिम युक्तिवादाकरिता ५ मार्च २०२० ही तारीख दिली आहे. त्याच्यावर १ ऑक्टोबर २००५ रोजी सिटी कोतवाली ठाण्यात भादंविचे कलम ४२०, ४६८ अन्वये गुन्हा दाखल होता.संतोष हा नागपूर मध्यवर्ती कारागृहात २००५ मध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना, त्याचे स्थालांतर अकोला मध्यवर्ती कारागृहात करण्यात आले होते. त्याला येथून १४ दिवसाची संचित रजा मिळाली होती. ती रजा वाढवून घेण्याकरिता त्याने पत्नी आजारी असल्याचे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र कारागृह अधीक्षकांना सादर केले होते. अधीक्षकांनी पडताळणी केली असता, त्यावरील स्वाक्षरी बनावट असल्याचे आढळून आले. याप्रकरणी सिटी कोतवालीत गुन्हा नोंदविण्यात आला होता. आरोपी संतोष आंबेकर याची बाजू वकील पंकज ताम्हणे, राजीव गुप्ता, गायत्री दाणी यांनी मांडली.