पांडे यांच्या डीजीपी पदाचे भवितव्य मंगळवारी ठरणार; यूपीएससी समितीची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 11:29 IST2021-08-27T11:29:18+5:302021-08-27T11:29:36+5:30
सीबीआयचे संचालक असलेल्या सुबोध जयसवाल यांनी महाराष्ट्र पोलीसप्रमुखपद सोडल्यानंतर आठ महिन्यांनी ही बैठक होत आहे. दरम्यानच्या कालावधीत राज्य पोलीस दलात उलथापालथ होऊन तिघांकडे प्रभारी पद सोपविण्यात आले आहे.

पांडे यांच्या डीजीपी पदाचे भवितव्य मंगळवारी ठरणार; यूपीएससी समितीची बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या साडेचार महिन्यांपासून महाराष्ट्र पोलीस दलाची धुरा सांभाळणाऱ्या संजय पांडे यांचे पोलीस महासंचालक-पदाबाबतचे भवितव्य येत्या मंगळवारी (दि.३१) निश्चित होणार आहे. महाराष्ट्र डीजीपीसाठी नावे निश्चित करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) निवड समितीची या दिवशी दिल्लीत बैठक होणार आहे. तीन जणांच्या यादीत त्यांची निवड झाल्यास पूर्णवेळ महासंचालकपदासाठीचा त्यांचा मार्ग मोकळा होईल. अन्यथा, मागच्या वेळीप्रमाणे अपात्र ठरविल्यास राज्य सरकारला पुन्हा अन्य अधिकाऱ्यांची निवड करावी लागणार आहे.
सीबीआयचे संचालक असलेल्या सुबोध जयसवाल यांनी महाराष्ट्र पोलीसप्रमुखपद सोडल्यानंतर आठ महिन्यांनी ही बैठक होत आहे. दरम्यानच्या कालावधीत राज्य पोलीस दलात उलथापालथ होऊन तिघांकडे प्रभारी पद सोपविण्यात आले आहे.
पोलीस महासंचालकपदाच्या निवडीबाबत सर्वोच्च न्यायालयाने प्रकाश सिंग खटल्याचा निकालावेळी काही निर्देश दिले आहेत. त्यानुसार या पदासाठी राज्य सरकारकडून यूपीएससीच्या निवड समितीकडे प्रस्ताव सादर करावयाचा आहे. त्यांनी निश्चित केलेल्या तीन जणांपैकी एकाची निवड राज्य सरकार डीजीपी पदावर करू शकते. जयसवाल ७ जानेवारीला कार्यमुक्त झाल्यानंतर १७ मार्चपर्यंत हेमंत नगराळे तर ९ एप्रिलपर्यंत रजनीश सेठ यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार होता, तर १० एप्रिलपासून पांडे यांच्याकडे कार्यभार आहे. पूर्णवेळ नियुक्तीसाठी राज्य सरकारने या पदासाठी ३० वर्षे किंवा त्याहून अधिक सेवा झालेल्या राज्यात सेवेत असलेल्या १९ जणांची नावे पाठविली आहेत. त्यात अग्रस्थानी संजय पांडे यांचे नाव आहे.
नोंदविले होते आक्षेप
यूपीएससीच्या निवड समितीने २०१९ मध्ये जयसवाल यांच्या नियुक्तीवेळी पांडे हे सेवा ज्येष्ठतेनुसार द्वितीय स्थानी होते. मात्र समितीने त्यांच्या ‘एसीआर’बद्दल आक्षेप नोंदवित त्यांच्यानंतरच्या संजय बर्वे व बिपीन बिहारी यांची नावे सुचविली होती.