स्टेट बँकेची सानगडी शाखा फोडली; ३० लाखांच्या रकमेसह सोने लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 19:06 IST2020-12-22T19:05:28+5:302020-12-22T19:06:13+5:30
SBI Crime news बँकेची खिडकी तोडून प्रवेश : रात्रपाळीत सुरक्षा रक्षकाचा अभाव

स्टेट बँकेची सानगडी शाखा फोडली; ३० लाखांच्या रकमेसह सोने लंपास
सानगडी (भंडारा) : भारतीय स्टेट बँक शाखेच्या इमारतीची खिडकी तोडून चोरट्यांनी ३० लाख रोख रक्कमेसह सोने लंपास केल्याची घटना साकोली तालुक्यातील सानगडी येथे मंगळवारी सकाळी उघडकीस आली. साकोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वृत्त लिहोस्तोअर चौकशी सुरू होती.
साकोली तालुक्यातील सानगडी येथे स्टेट बँकेची शाखा आहे. एका भाड्याच्या इमारतीत ही बँक सुरू आहे. जवळपास ४३ गावांचा व्यवहार या बँकेतून चालतो. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे बँकेचे कर्मचारी कामकाजासाठी गेले असता बँकेच्या मागील भागातील खिडकी तोडल्याचे दिसून आले. त्यावेळी बँकेत काही तरी घडल्याची जाणीव झाली. आत जावून बघितले तेव्हा बँकेच्या आतील लॉकर तुटल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती तात्काळ साकोली पोलिसांना देण्यात आली. साकोली पोलिसांचे पथक सानगडी येथे पोहचले. बँकेतील किती रक्कम व किती सोने चोरीला गेले हे कळू शकले नाही. पोलीस घटनास्थळी किती रक्कम आणि सोने चोरीस गेले याची माहिती घेत आहेत. मात्र सुमारे ३० लाख रुपये रोख चोरीस गेल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.
सानगडी परिसरातील ही महत्वाची बँक आहे. परंतु रात्रपाळीत येथे सुरक्षा रक्षक नसल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती आणि साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी तुकाराम काटे तळ ठोकून आहेत. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या काळात साकोली येथील बँक ऑप इंडियाच्या शाखेत धाडसी चोरी झाली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.