अनधिकृत इमारतीत फ्लॅट विक्री प्रकरणी उल्हासनगरात बिल्डरसह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा
By सदानंद नाईक | Updated: February 24, 2025 18:53 IST2025-02-24T18:52:52+5:302025-02-24T18:53:45+5:30
विठ्ठलवाडी पोलीस यासंदर्भात अधिक तपास करीत आहेत

अनधिकृत इमारतीत फ्लॅट विक्री प्रकरणी उल्हासनगरात बिल्डरसह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा
सदानंद नाईक, उल्हासनगर: कल्याण महापालिकेने अनधिकृत इमारत घोषित केली असताना तसेच उच्च न्यायालय व उल्हासनगर न्यायलयात याबाबत वाद सुरु असतानाही वक्रतुंड इमारती मधील एकूण १० प्लॅटची विक्री बिल्डरसह तिघांनी करून १ कोटी २० लाखाची फसवणूक केली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
कल्याण महापालिका हद्दीतील चिंचपाडा येथे सन-२०१६ साली वक्रतुंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सदस्य व जागेचे मालक सुभाष मारुती म्हात्रे तसेच अभिषेक सुभाषचंद्र तिवारी व राजेशकुमार भिकनलाल शर्मा यांनी यांनी कायदेशीर कोणतीही परवानगी न घेता वक्रतुंड नावाची इमारत उभी केली. या इमारतीला कल्याण महापालिकेने अनधिकृत घोषित केले असून इमारती बाबत उच्च न्यायालय व उल्हासनगर न्यायालयात वाद सुरु आहे. हा सर्व प्रकार माहित असताना दिपक सखाराम कानोरे यांच्यासह ९ जणाला सन-२०१६ ते आजपर्यंत १ कोटी २० लाखाच्या किंमतीला एकूण १० प्लॅट विकून फसवणूक केली. इमारती मधील प्लॅटधारक दिपक कानोरे यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस करीत आहे.