दिवसाढवळ्या ड्रग्जची विक्री; कारवाई होत नसल्याने तरुणाची हायकोर्टात धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 20:35 IST2019-05-13T20:33:11+5:302019-05-13T20:35:51+5:30
या याचिकेची दखल घेऊन न्यायमूर्तींनी राज्य सरकारला प्रतिज्ञापत्रावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

दिवसाढवळ्या ड्रग्जची विक्री; कारवाई होत नसल्याने तरुणाची हायकोर्टात धाव
मुंबई - भिवंडी येथील शांतीनगर परिसरात दिवसाढवळ्या ड्रग्जची विक्री होत असून अनेक तरुण मुले ड्रग्जच्या आहारी जात आहेत. मात्र, पोलिसांकडूनही ठोस कारवाई होत नसल्याने एका २२ वर्षीय वर्षीय तरुणाने याप्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेची दखल घेऊन न्यायमूर्तींनी राज्य सरकारला प्रतिज्ञापत्रावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
भिवंडीतील शांतीनगर परिसरातील बावला कंपाउंड, जब्बार कंपाउंड आणि चव्हाण कॉलनी या ठिकाणी जुगाराचे अड्डे सुरु असून या ठिकाणी राजरोसपणे ड्रग्सची विक्री केली जाते. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करूनही पोलीस दखल घेत नसल्याने खान अहमद या तरुणाने मुंबई हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. याचिकेवर नुकतीच सुट्टीकालीन न्यायालयाचे न्या. एम. एस. कर्णिक आणि न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायमूर्तींनी राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देत सुनावणी १३ मेपर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली आहे.