मध्य प्रदेशातील सागर येथील शाहपूरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका तरुणाने इन्स्टाग्रामवर लाईव्ह येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. राहुल अहिरवार असं तरुणाचं नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी राहुलने इन्स्टाग्राम लाईव्हद्वारे एका व्हिडिओमध्ये त्याची व्यथा मांडली. ज्यामध्ये त्याने म्हटलं की, तो एका तरुणीवर प्रेम करतो आणि तिने लग्नाचं आमिष दाखवून त्याची फसवणूक केली.
तरुणाचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो इन्स्टाग्रामवर लाईव्ह आत्महत्या करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये राहुल म्हणत आहे की, मला जगायचं नाही, मी फाशी घेणार आहे. आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका. माझ्याकडे जास्त वेळ नाही, तुम्ही सर्वजण लाईव्ह पाहा. यानंतर राहुलने गळफास घेऊन आत्महत्या केली.
कुटुंबातील सदस्यांनी छतरपूर येथील रहिवासी असलेल्या युट्यूबर जान्हवी साहूवर गंभीर आरोप केले आहेत. राहुलच्या भावाने सांगितलं की जान्हवी आमच्या घरी अनेकदा येत असे आणि राहुलला बाहेर फिरायला घेऊन जात असे. त्याने असंही सांगितलं की, २ जून रोजी राहुलचा वाढदिवस होता, जान्हवी त्या दिवशी घरी आली आणि राहुलला उज्जैनला फिरायला घेऊन गेली.
माहिती मिळताच शाहपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी तरुणाच्या कुटुंबीयांची चौकशी करून पुढील कारवाई सुरू केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या लाईव्ह व्हिडिओमुळेही लोकांना धक्का बसला आहे.