Sachin Vaze wanted to have a 'fake encounter' in Antilia bomb scare, Mansukh hiren case | Sachin Vaze: अँटिलियाजवळ स्फोटके ठेवण्यामागे सचिन वाझेचा होता मोठा डाव; विचार बदलला अन् स्वत:च अडकला

Sachin Vaze: अँटिलियाजवळ स्फोटके ठेवण्यामागे सचिन वाझेचा होता मोठा डाव; विचार बदलला अन् स्वत:च अडकला

- जमीर काझी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली कार आणि ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सचिन वाझेने या प्रकरणामध्ये दोघा गुंडांना खोटी चकमक (फेक एन्काऊंटर) घडवून मारण्याचा कट रचलेला होता, अशी धक्कादायक माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) तपासातून समोर आली आहे. या गुन्ह्याच्या तपासाचे श्रेय घेण्यासाठी त्यांना जिहादी अतिरेकी भासवून मारायचे होते, मात्र शेवटच्या क्षणी त्याला विचार बदलावा लागला आणि स्वतः रचलेल्या जाळ्यात तो अडकल्याचे सुत्रांनी सांगितले. (Sachin Vaze want to kill 2 gangster in Fake encounter.)


एका हायप्रोफाईल गुन्ह्यातील दोघा आरोपींना अतिरेकी भासविण्यासाठी त्याने मोटार, हत्यारे व बुलेटस (जिवंत काडतुसे) जमवली होती. एनआयएने ती जप्त केली. निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझे हा या गुन्ह्यात अटक होइपर्यंत क्राईम ब्रँचचा सर्वेसर्वा होता. ताे थेट आयुक्तांना रिपोर्टिंग करत असल्यामुळे एपीआय असूनही ताे अन्य वरिष्ठांना जुमानत नसे, त्यामुळे २५ फेब्रुवारीला अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ ३०० मीटर अंतरावर पार्क केलेल्या स्काॅर्पिओमध्ये २० जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र सापडल्यानंतर याचा तपास गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाकडे (सीआययू) देण्यात आला होता.


भरपूर प्रसिद्धी मिळवण्यासह अंबानी यांच्याकडून मोठी रक्कम उकळण्यासाठी वाझेने हा मोठा कट रचला होता. त्यानुसार या गुन्ह्यात सीआययू तपास करत असलेल्या एका हायप्रोफाईल गुन्ह्यातील दोघांना अटक करुन त्यांना अतिरेकी भासवायचे होते, त्यांना एका कारमध्ये ठेवून एका निर्जन ठिकाणी न्यायचे, त्यांच्याकडे हत्यारे आणि जिवंत काडतुसे ठेवूल दोघांचा एन्काऊंटर करायचा, असे वाझेने ठरवले होते. त्यासाठी त्याने औरंगाबादमधून इको मोटार, ६२ बुलेट्स मिळवल्या होत्या. ज्याला अतिरेकी भासवायचे होते त्यापैकी एकाचा पासपोर्टही घेतला होता. मात्र, शेवटच्या क्षणी त्याचा प्लान फसला.

...म्हणून मनसुख हिरेनची हत्या?
वाझेच्या घरातून जप्त केलेल्या ६२ बुलेट्स या बनावट एन्काऊंटरसाठी आणल्या होत्या. त्याच्या या योजनेची वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना होती का, त्याचा हा डाव कशामुळे फसला, या बाबी अद्याप अनुत्तरित आहेत. दरम्यान, मनसुख हिरेन हा गेल्या काही वर्षांपासून वाझेच्या नित्य सानिध्यात होता, त्याला सोबत घेऊन वाझेने गुन्ह्याचा कट रचला होता, मात्र ऐनवेळी एन्काऊंटरचा डाव रद्द झाल्याने त्याने हिरेनला थोड्या दिवसांसाठी या गुन्ह्यात अटक होण्यास सांगितले. मात्र, अब्रू जाण्याच्या भीतीने त्याने नकार दिला, त्याच्यामुळे आपले सर्व बिंग फुटेल, असे वाझेला वाटल्याने त्याने सहकाऱ्यासमवेत ४ मार्चला हिरेनची हत्या केल्याचा संशय अधिकाऱ्यांना आहे.

Web Title: Sachin Vaze wanted to have a 'fake encounter' in Antilia bomb scare, Mansukh hiren case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.